भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी २६ मार्च रोजी आत्महत्या केली होती. तिने वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. प्रथमदर्शनी या घटनेला आत्महत्या म्हणत पोलिसांनी तपास सुरू केला होता, पण नंतर अभिनेत्रीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंह व त्याच्या भावाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तीन दिवस होऊनही आकांक्षा दुबेचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आलेला नाही. तसेच त्या रात्री तिला हॉटेलमध्ये सोडायला आलेल्या तरुणाबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. आकांक्षा दुबेच्या खोलीत त्या रात्री १७ मिनिटं कोण थांबलं होतं, हे सांगण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. तो तरुण खोलतून गेल्यावर आकांक्षा इंस्टाग्रामवर लाईव्ह आली आणि रडताना दिसली होती. हॉटेलच्या खोलीत कोण आले होते हे जाणून घेण्यासाठी ‘आज तक’ची टीम वाराणसीच्या सारनाथ भागातील त्याच हॉटेल सोमेंद्र रेसिडेन्सीमध्ये पोहोचली, पण तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आणि सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले.
Video: “मी याची खात्री…” घटस्फोटांच्या चर्चांनंतर दीपिकाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणवीर सिंग
आकांक्षा दुबेचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अजूनही समोर आलेला नाही. शहरातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रिपोर्ट येण्यास काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांच्या सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, प्राथमिक अहवालात आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी पोलीस आरोपी समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांना पकडू शकलेले नाहीत. सध्या ते त्या दोन्ही भावांच्या शोधासाठी पथकं तयार करून ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.