२०२२ मध्ये अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ असे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अक्षयच्या आगामी चित्रपटांवर देखील पडला. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या बॉलिवूडविरोधी ट्रेंडमुळे चित्रपट पुढे धकलण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला. काहींनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. या सगळ्यात अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ हा नवा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
‘कटपुतली’ चित्रपट २०१८ सालच्या ‘राक्षसन’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह, सरगुन मेहता, चंद्रचूर सिंह, गुरप्रीत घुग्गी असे कलाकार आहेत. या व्यतिरिक्त पंजाबी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकार देखील या चित्रपटामध्ये झळकले आहेत. सायको किलर या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘कटपुतली’ चित्रपटाची कथा ‘कसौली’ येथे राहणाऱ्या एका होतकरु लेखकाच्या अवतीभवती फिरते. सध्या अक्षयला त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ‘कटपुतली’च्या निमित्ताने आणखी एक रिमेक तयार केल्यामुळेही त्याच्यावर टीका होत आहेत.
आणखी वाचा- “याच्यामुळे माझे चित्रपट चालत नाही कारण…” अक्षय कुमारचा कपिल शर्मावर आरोप
सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या कटपुतली चित्रपटामधील एक सीन व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये अक्षय जीवनातील व्यक्तींचे महत्त्व समजवत आहे. तो म्हणतो, ‘सर्वात आधी देव पूज्यनीय असतात.. त्यानंतर आई-वडील, मग बहिण-भाऊ, नातेवाईक, शेजारचे आणि त्यानंतर मग गुरुचे स्थान येते.’ त्यावर रागावत रकुल ‘तुमच्या घरी कुत्रे नाहीये का ? त्यांनाही लिस्टमध्ये टाका ना..’ असे म्हणते. सोशल मीडियावर हा सीन व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी या सीनशी साम्य असणारा एक व्हिडीओ समोर आला.
हा व्हिडीओ सुप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम ऊर्फ बीबी याच्या ‘बीबी के वाईन्स’ या चॅनलवरच्या जुन्या क्लिप्समधला आहे. दोन्हींमधील समानता लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल केले जात आहे. एका युजरने ‘अक्षय सुद्धा भुवनचा चाहता आहे’ असे म्हटले, तर दुसऱ्या युजरने ‘कॉपी थोडी केली आहे.. त्यांनी तर प्रेरणा घेतली आहे’ असे म्हणत अक्षयला ट्रोल केलं आहे.