बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’मुळे चर्चेत आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं प्रसारमाध्यमांशी मनमोकळा संवाद साधला. अक्षय कुमारनं यावेळी, ‘हा चित्रपट शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दाखवणं बंधनकारक केलं जावं. कारण सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दलचा इतिहास पुस्तकांमध्ये खूपच मर्यादित स्वरूपात आहे’ असं वक्तव्य केलं.
‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात जेव्हा अक्षय कुमारला, ‘पंतप्रधान मोदींसाठी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग केलं जाणार आहे का?’ असं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं खूपच सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला, “पंतप्रधान मोदीजींना हा चित्रपट दाखवणार मी कोण आहे? जर त्यांना चित्रपट पाहायचा असेल तर ते नक्कीच पाहतील याची मला खात्री आहे.” अक्षय कुमारच्या या उत्तरानं सर्वच उपस्थितांची मनं जिंकली.
अक्षय कुमार म्हणाला, “मला डॉ. साहेबांचं (द्विवेदी) ‘पृथ्वीराज रासो’ हे पुस्तक वाचण्यासाठी देण्यात आलं होतं. मी संपूर्ण पुस्तक वाचून काढलं त्यावेळी मला समजलं की ते किती महान योद्धा होते. पण त्यांच्याबद्दल इतिहासात फक्त एक पॅराग्राफमध्येच लिहिण्यात आलं आहे. मला वाटतं शिक्षणाचा एक भाग म्हणून हा चित्रपट शाळांमध्ये दाखवायला हवा. जेणेकरून मुलांपर्यंत हा इतिहास आणि सम्राट पृथ्वीराज चौहान यांचं कर्तृत्व पोहोचेल. त्यांचा इतिहास मुलांना कळेल.”
आणखी वाचा- ‘पृथ्वीराज’च्या ट्रेलर लॉन्चवेळी आईच्या आठवणीत भावूक झालेला अक्षय कुमार, म्हणाला…
दरम्यान या चित्रपटात अक्षय कुमार ‘पृथ्वीराज चौहान’ यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.