अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा चुलत भाऊ आणि अक्षय कुमारचा मेव्हणा करण कपाडिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. टोनी डिसूझाच्या प्रॉडक्शनअंतर्गत निर्मित ‘ब्लॅँक’ या चित्रपटातून तो पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करण हा डिंपल कपाडियाची बहिण सिंपल कपाडियाचा मुलगा आहे.
‘ब्लँक’ या चित्रपटात सनी देओल महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे डिंपल यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास तब्बल २४ वर्षांनंतर सनी देओल- डिंपल कपाडिया एकत्र काम करतील. बेहजद खंबाटा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून ३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Blank poster for #Blank… Yes, you read it right… #Blank stars newcomer Karan Kapadia [Dimple Kapadia's nephew] with Sunny Deol in a pivotal role… Directed by Behzad Khambata… 3 May 2019 release. pic.twitter.com/mbJY7pZVUQ
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2019
टोनी डिसूझासोबत अक्षयने ‘ब्लू’ आणि ‘बॉस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय आणि अक्षयचे त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे टोनीने करणला लाँच करावं अशी अक्षयची इच्छा होती. १४ वर्षांचा असल्यापासून मला चित्रपटात काम करण्याची आवड असल्याचं अक्षय आणि मावशी डिंपल यांना सांगितलं होतं, असं करणने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘लहानपणी मी कोणाशी जास्त बोलत नव्हतो, जास्त कोणामध्ये मिसळत नव्हतो. त्यामुळे मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असेल म्हणून कोणालाच वाटलं नव्हतं. पण जेव्हा माझी इच्छा मी कुटुंबीयांना सांगितली तेव्हा त्यांनी मला साथ दिली. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नसेल हे त्यांनी (अक्षय आणि डिंपल) मला आधीच सांगितलं आहे.’