मागच्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे. ज्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. गुर्जर समाजाच्या एका संघटनेनं या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या संघटनेचा दावा आहे की, १२ व्या शतकातील सम्राट पृथ्वीराज चौहान राजपूत नाही तर एक गुर्जर राजा होते. या संघटनेनं चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांना एक गुर्जर राजा म्हणूनच दाखवण्यात यावं.
पृथ्वीराज चौहान यांचं साम्राज्य उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये पसरलं होतं. त्यांचं राज्याच्या राजधानी अजमेर ही होती. आता अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेनं दावा केला आहे की पृथ्वीराज चौहान हे एक गुर्जर राजा होते. महासभेचे आचार्य वीरेंद्र विक्रम यांनी दावा केला आहे की ‘पृथ्वीराज रासो’च्या पहिल्या भागात पृथ्वीराज चौहान याचे वडील सोमेश्वर हे एक गुर्जर राजा असल्याचा उल्लेख आहे. ते म्हणाले, “असे बरेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होतं की पृथ्वीराज चौहान हे गुर्जर राजा होते. म्हणून चित्रपट निर्मात्यांकडे आमची मागणी आहे की, चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांना राजपूत नाही तर गुर्जर राजा म्हणून दाखवण्यात यावं.”
आणखी वाचा- Cannes 2022 : कान्स चित्रपट महोत्सवाला अमृता फडणवीस यांची हजेरी, फोटो शेअर करत म्हणाल्या…
दरम्यान या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.