बॉलिवूडमधील अनेक सिमेमांना आजवर करणी सेनेने विरोध दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधी खिलाडी कुमारच्या सिनेमाला करणी सेनेने विरोध केलाय. अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या आगामी सिनेमावर करणी सेनेने आक्षेप नोंदवला आहे. सिनेमाच्या नावावरून करणी सेना आता विरोध करू लागली आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाच्या नावात बदल करण्याची मागणी केलीय. “जर सिनेमा महान राज्यकर्ता पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे तर सिनेमाच्या नावातही त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा.” असं सुरजीत सिंह म्हणाले आहेत.
एवढंच नाही तर करणी सेनेने इतरही काही मागण्या केल्या आहेत. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलीय. “जर त्यांनी आमचा सल्ला मानला नाही तर वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लिला भन्साळी यांच्या सोबत काय झालं हे ध्यानात ठेवावं. या सिनेमाच्या निर्मात्यांना देखील मग यासाठी तयार रहावं लागेल. ” असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिलाय.
अक्षय कुमारने २०१९ सालामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा केली होती. “वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या एतिहासिक सिनेमाची घोषणा करताना गर्व वाटतोय. हा सिनेमा माझ्या आतापर्यंतच्या मोठ्या सिनेमांपैकी सर्वात मोठा सिनेमा आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे.” अशा आशयाचं ट्विट अक्षयने केलं होतं.
‘पृथ्वीराज’ सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर झळकणार आहे. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून आदित्य चोपडा या सिनेमाची निर्मिती करणार आहे.