बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. भावा-बहिणीच्या नात्यावर आधारलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या अक्षय कुमारच्या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता अक्षयचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या अक्षय कुमार हा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच त्याने ‘सुपरस्टार सिंगर २’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका व्हिडीओमुळे अक्षय कुमार भावूक झाला.

यावेळी ‘सुपरस्टार सिंगर २’च्या स्पर्धकांनी अक्षय कुमारसमोर ‘फुलो का तारो का सबका केहना है… ” हे गाणं सादर केलं. त्यासोबत अक्षय कुमार आणि त्याच्या बहिणीचे फोटो, व्हिडीओ दाखवण्यात आले. हे सर्व पाहून अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी आले. यासोबतच अक्षय कुमारची बहिण अल्का भाटियाचा व्हिडीओ मेसेज दाखवण्यात आला. ज्यामुळे अक्षय कुमार बालपणीच्या सर्व आठवणीत फारच भावूक झाला.

आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर

यावेळी त्याची बहिण अल्काने व्हिडीओद्वारे अक्षय कुमारचे विशेष आभार मानले. अक्षय कुमारने प्रत्येक कठीण प्रसंगात तिची साथ दिल्याबद्दल तिने त्याचे कौतुकही केले. तसेच एक भाऊ म्हणून त्याने मला कायमच साथ दिली. पण त्यासोबत प्रसंगी तो माझे वडील आणि मित्र दोन्हीही झाला, असेही त्या म्हणाल्या.

यावर प्रतिक्रिया देत अक्षय कुमारने सांगितले, “आम्ही लहानपणी एका छोट्या घरात राहायचो. मात्र या देवीचा (बहिणीचा) आमच्या जीवनात प्रवेश झाला आणि सर्व काही बदललं. आपल्या बहिणीसोबत असलेल्या आपल्या नात्यापेक्षा मोठं कोणतंही नातं नसतं.” अक्षयने सांगितलेल्या या आठवणीने उपस्थित सर्वजण भावूक झाले.

आणखी वाचा – ‘रक्षाबंधन’, ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये कोणता चित्रपट ठरणार सुपरहिट?, अक्षय म्हणतो, “अशी आशा आहे की…”

येत्या ११ ऑगस्टला अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader