बॉलिवूडमध्ये विविध कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात. त्यातही काही कलाकारांच्या मुलांवर प्रसारमाध्यमांच्या नेहमीच नजरा असतात. अशीच एक कलाकार बाप-बेट्याची जोडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचा मुलगा आरव. एका चांगल्या अभिनेत्यासोबतच अक्षय कुमार एका चांगल्या वजिलांची भूमिकाही अगदी न चुकता पार पाडत आहे. चित्रपट आणि कुटुंबामध्ये योग्य तो समतोल राखत अक्षय नेहमीच त्याच्या भूमिका चोखपणे बजावतो.
खिलाडी कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच आरवसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह केपटाऊनला गेला असतानाचा हा फोटो. तसे पाहिले तर अक्षय त्याच्या दोन्ही मुलांच्या अगदी जवळचा आहे. पण, या केपटाऊन सफरीमध्ये मात्र त्याने आपल्या मुलासोबतच जास्त वेळ घालवल्याचे दिसत आहे. अक्षयने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तो आणि त्याचा मुलगा आरव एका बाकावर पाठमोरे बसलेले दिसत आहेत. अशा या शांत वातावरणात अक्षयने त्याच्या मुलासोबत काही दुर्मिळ क्षण व्यतित केले असणार यात शंकाच नाही. या फोटोसह खिलाडी कुमारने एक भावूक कॅप्शनही लिहिले आहे. ‘तो क्षण, ज्यावेळी तुम्हाला जाणीव होते की, तुमचा मुलगा आता लहान राहिला नाही. त्याची उंचीही जवळपास माझ्याइतकीच झाली आहे, तो माझे शुजही वापरतो’, असे कॅप्शन अक्षयने लिहिले आहे.
अक्षयने पोस्ट केलेला हा फोटो सध्या अनेकांची मनं जिंकत आहे. अक्षय कुमारने काही महिन्यांपूर्वीही त्याच्या कुटुंबासह एका सहलीवर गेल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. असा हा खिलाडी कुमार या आनंददायी सहलीनंतर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यग्र होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खिलाडी कुमार अभिनेत्री राधिका आपटेसह स्क्रिन शेअर करणार असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, अक्षय कुमार रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या निर्मितीमध्ये बनणाऱ्या ‘गोल्ड’ या चित्रपटातही काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहे. या चित्रपटात १९४८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या १४ व्या ऑलिम्पिकची कथा आहे. १४ व्या ऑलिम्पिक खेळात स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते. अक्षयचा हा ‘गोल्ड’ चित्रपट २०१८ च्या स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होणार आहे. स्वतः अक्षयने या चित्रपटाचा पहिला पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता.