बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा असो किंवा रवीना टंडन अक्षय कुमारच्या अफेअरची चर्चा अनेकांनाच माहित आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. मात्र तिच्या आणि अक्षयच्या रिलेशनशिपबद्दल खूप कमी बोललं गेलं. या अभिनेत्रीने ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब पटकावला होता.
या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा बत्रा. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमारचं पदार्पण होण्यापूर्वीपासून पूजा बत्रासोबत त्याच्या अफेअरची चर्चा होती. इतकंच नव्हे तर पूजामुळेच अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाली असंही म्हटलं जातं. पूजा मॉडेलिंग करत असताना अक्षय तिला डेट करत होता. तिच्यासोबत बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाऊ लागल्यानंतर अक्षयच्या ओळखी वाढल्या आणि त्यातूनच त्याला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाली असं म्हटलं जातंय.
हळूहळू अक्षयच्या चित्रपटांना यश मिळू लागलं आणि तो प्रेक्षकांची मनं जिंकू लागला. या यशानंतर पूजा आणि अक्षयचे मार्ग वेगळे झाले. आज अक्षय प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पूजाची ओळख मात्र बॉलिवूडमध्ये कुठेतरी हरवल्याचं दिसतं.
वाचा : विनोद मेहरा यांचा मुलगा ‘या’ हॉट अभिनेत्रीला करतोय डेट
पूजा बत्रानंतर अनेक अभिनेत्रींसोबत अक्षयचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात ट्विंकल खन्ना आली आणि २००१ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. लगेचच त्याच्या दुसऱ्या वर्षी पूजानेही ऑर्थोपिडिशियन सर्जन डॉक्टर सोनू आहलुवालियासोबत लग्न केलं. मात्र दुर्दैवाने पूजाचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. २०११ मध्ये तिचा घटस्फोट झाला.
गेल्या महिन्यातच पूजा बत्राचा ‘मिरर गेम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारदेखील उपस्थित होता. दरम्यान अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित असलेल्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे.