अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेच. पण यादरम्यान त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अक्षयचा मराठमोळा हेअर स्टायलिस्ट मिलन जाधव यांचं आज निधन झालं आहे. अक्षयने मिलन यांच्याबरोबर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याचबरोबरीने भावनिक पोस्ट शेअर करत त्याने दुःख व्यक्त केलं.
अक्षयने मिलन जाधव यांच्याबरोबर फोटो शेअर करत म्हटलं की, “उत्तम हेअरस्टाइल आणि तुझ्या हास्याने तू प्रचंड गर्दीतही उठून दिसत होतास. माझा एक केसही इकडे-तिकडे होणार नाही याची तू पुरेपूर काळजी घेतलीस. सेटवरील ते आयुष्य, १५ वर्षांहून अधिक काळ माझा हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणारा मिलन जाधव. अजूनही विश्वास बसत नाही की तू आम्हाला सोडून गेला आहेस. मिलानो मला तुझी नेहमीच आठवण येत राहिल. ओम शांती.”
मिलन यांचं निधन कशामुळे झालं याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आली नाही. अक्षयने मिलन जाधव यांच्याबाबत किती वर्ष काम केलं? हे आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसेच त्याने दुःख देखील व्यक्त केलं आहे. अक्षय व्यतिरिक्त बॉलिवूडच्या इतर कलाकार मंडळींसाठी देखील मिलन यांनी काम केलं होतं. करीना कपूर खान, कियारा अडवाणीबरोबरचे देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आणखी वाचा – Koffee With Karan 7 : अजूनही तरुण दिसण्यामागचं रहस्य काय? अनिल कपूर म्हणतात, “सेक्स, सेक्स अन्…”
अक्षयसह मिलन इतर कलाकार मंडळींचे लाडके होते. अक्षयने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी मिलन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अक्षय खरंच खूप दुःखद बातमी. मिलन यांच्या जवळच्या व्यक्तींच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.” असं अनिल कपूर यांनी कमेंट करत म्हटलं आहे.