रेश्मा राईकवार
महम्मद घोरीसारख्या परकीय आक्रमकाला ठार मारणाऱ्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा आयुष्यपट मांडणं ही तशी अवघडच कामगिरी. मुळात पृथ्वीराज यांच्याबद्दलचे ऐतिहासिक संदर्भ हे विविध साहित्यातून विखुरलेले आहेत. त्यामुळे तपशिलात जाऊन या संदर्भाचा अभ्यास आणि त्या ताकदीनिशी तो उलगडेल, ही अपेक्षा ‘चाणक्य’कार चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्याकडून होती. प्रत्यक्षात इतिहासकालीन वस्त्रे लेऊन यशराजच्या साचेबध्द प्रेमकथांपैकी एक पाहात आहोत की काय.. असा भास होतो. ना धड इतिहास, ना प्रेमकथा, कुठेच हा चित्रपट खरा उतरत नाही.
‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची कथा पृथ्वीराज यांचे दरबारी कवी चांद बरदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो’ या कवितेवरून बेतली आहे. या कवितेनुसार आधारित चित्रपटात पृथ्वीराज यांचे महम्मद घोरीविरोधातील तराईतील पहिले युध्द, घोरीची हार, बंदी बनून आणलेल्या घोरीला पृथ्वीराज यांनी दिलेले जीवनदान आणि या अतुलनीय पराक्रमामुळे मिळालेली दिल्लीची सत्ता हा घटनाक्रम विस्ताराने येतो. याच बरोबर समांतर पातळीवर कनोजचे राजे जयचंद यांची कन्या संयोगिता आणि पृथ्वीराज यांची प्रेमकथाही रंगत जाते. एकमेकांना प्रत्यक्ष न पाहता प्रेमात पडलेल्या या दोघांची कथा एकमेकांना पाठवल्या जाणाऱ्या पत्रांमधून वाढत राहते. अखेरीस दिल्लीच्या सत्ताकारणावरून सुरू झालेला जयचंद आणि पृथ्वीराज यांचा संघर्ष होत्याचं नव्हतं करून जातो. इतिहासातील काही घटना या कधीही न पुसता येणाऱ्या डागांसारख्या दिसत राहतात, आतल्या आत ठसठसत राहतात. पृथ्वीराज यांचा बळीही अखेर घोरीच्या पराक्रमाने नाही, तर सत्तेच्या प्रेमापोटी झालेल्या अंतर्गत बंडाळीनेच घेतला आहे. बाहेरच्या आक्रमकांपेक्षा घरच्या भेद्यांनीच अनेकदा पराक्रम संपवला आहे, ही गोष्ट ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातही अधोरेखित झाली आहे. लेखक झ्र् दिग्दर्शक म्हणून निडरपणे सत्य मांडण्याची चंद्रप्रकाश द्विवेदी यांची शैली इथे ठळकपणे जाणवते. मात्र कित्येक वर्षांपूर्वी कुठल्याही सोयीसुविधा नसताना द्विवेदींनी लिहिलेली ‘चाणक्य’सारखी तपशीलवार आणि प्रभावी ऐतिहासिक मालिका आठवायची म्हटलं तर ‘सम्राट पृथ्वीराज’ त्याच्या आसपासही जाण्याचे धाडस करू शकलेला नाही, असं खेदाने म्हणावं लागेल.
आधी उल्लेख केला आहे त्याप्रमाणे हा चित्रपट ‘पृथ्वीराज रासो’ या कवितेवरून बेतला आहे. आणि चांद बरदाई यांनी लिहिलेले हे काव्य अतिशयोक्तीने भरलेले आहे, त्यातील ऐतिहासिक संदर्भ अचूक म्हणून ग्राह्य धरता येत नाहीत. त्यापलीकडे पृथ्वीराज यांच्या संदर्भातील अनेक घटना, इतिहास हा तत्कालीन विविध साहित्यातून तुकडय़ा-तुकडय़ातून विखुरलेला आणि वेगळय़ा वेगळय़ा पध्दतीने सांगितलेला आढळतो, असा उल्लेखही काही ठिकाणी आहे. हा सगळा संदर्भ इथे चित्रपटाची सत्य-असत्यता तपासण्यासाठी नाही, तर मुळात पृथ्वीराज यांची व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर उभी करताना त्यांची शरीरयष्टी, देहबोली, त्यांचे विचार या सगळय़ाचा तपशीलवार अभ्यास गरजेचा होता, जो चित्रपटात अजिबात जाणवत नाही. या चित्रपटाची कथा दहा वर्षांपूर्वीच लिहिण्यात आली होती. प्रत्यक्षात निर्माता मिळून चित्रपट प्रत्यक्ष आकार घेताना मध्ये गेलेली काही वर्ष आणि खुद्द चित्रीकरणासाठी घेतलेला अत्यंत कमी वेळ या विरोधाभासाचा परिणाम चित्रपटावर झाला आहे की काय? अशी शंका घ्यायला वाव आहे.
एका महान राजाची कथा सांगताना त्याची प्रेमकथा, त्याचे शौर्य हे सगळं उत्तम पटकथेत बांधणं ही प्राथमिक गरज ठरते. बाकी एकंदरीतच इतिहासपटांची एक लाट आली आहे, त्यांचा ठरावीक पध्दतीचा ढाचा ठरलेला आहे. त्यानुसारच हाताळणी करण्याचा अट्टहास इथे चित्रपटाला मारक ठरला आहे. कलाकारांच्या चुकीच्या निवडीने त्यात आणखी भर घातली आहे. अभिनेता म्हणून अक्षय कुमार ताकदीचा आहे आणि त्याने भूमिकेसाठी मेहनतही घेतली असली तरी कुठेही पृथ्वीराज म्हणून तो प्रभावी वाटत नाही, त्याउलट पृथ्वीराजची सावली बनून वावरणाऱ्या चांद बरदाई यांच्या भूमिकेतील सोनू सूद अनेकदा अक्षयपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. अक्षयच्या पाठीशी उभा असलेला सोनू सूद जास्त लक्ष वेधून घेतो. संयोगिताच्या भूमिकेतील विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा अभिनेत्री म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. कॅमेऱ्यासमोर वावरण्याचा आत्मविश्वास तिच्याकडे आहे, मात्र अभिनयाच्या बाबतीत तिला अजून भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. सरळ चेहऱ्याने राग आणि प्रेम एकाच रेषेत व्यक्त करणारी मानुषी फारसा प्रभाव टाकत नाही. त्यात तिला देण्यात आलेली वेशभूषा, तिच्यावर चित्रित झालेली नृत्ये, गाण्यांचे शब्द हा सगळाच प्रकार समकालीन वाटत राहतो. तिथे कुठेही ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतल्याचे जाणवत नाही. त्याचाही फटका चित्रपटाला बसला आहे. कलाकार आणि व्यक्तिरेखांचा विचार करता घोरीच्या भूमिकेतील मानव विज हा बदल सुखावह आहे. कुठेही तारस्वरात न ओरडणारा, कुठलाही रानटी-हिंसकपणा न दाखवता वावरणारा मानव विज यांनी साकारलेला घोरी अधिक खरा वाटतो. अभिनेता आशुतोष राणा यांना जयचंदसारख्या ताकदीच्या भूमिकेत पाहणं ही नेहमीप्रमाणे पर्वणी ठरली आहे. अगदी मोजके क्षण आणि काही वाक्य वाटय़ाला येऊनही अभिनेत्री साक्षी तन्वरने जयचंद याची एकनिष्ठ पत्नी आणि आपल्या मुलीची हुशारी, स्त्रीचं स्वत्त्व ओळखणारी आई या दोन्ही छटा कमाल रंगवल्या आहेत. तिचा काही क्षणांचा वावर आणि राणी झाल्यानंतर स्त्रीचे हक्क, स्वातंत्र्य याबाबत संयोगिताने दिलेले भाषण यात केवळ नजर आणि कृतीतून साक्षीने व्यक्त केलेल्या भावनांचे पारडे जड ठरते. अभिनेता संजय दत्तने साकारलेली काका कान्ह ही व्यक्तिरेखा मुळात लिखाणातच फार प्रभावी नाही, तरीही त्याच्या सहज अभिनयाने ती तरून जाते.
एक चांगला विषय केवळ तांत्रिक साहाय्याने अधिक सोप्यात सोप्या शैलीत मांडण्याची घाई चित्रपटात ठायी ठायी जाणवते. घोडय़ावर बसण्यापासून ते सिंहाशी दोन हात करण्यापर्यंतचे कित्येक प्रसंग हे व्हीएफएक्सने जोडले असल्याचे जाणवते. तंत्राचा अतिवापर, प्रेमकथेत गेलेला वेळ या सगळय़ामुळे ना धड पराक्रमाचा इतिहास ना प्रेमकथा.. अशा काहीशा विचित्र गोंधळात हा चित्रपट संपतो.
सम्राट पृथ्वीराज
दिग्दर्शक – चंद्रप्रकाश द्विवेदी
कलाकार – अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर.