‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. यानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये येणार आहे.
नुकतंच अक्षय कुमारने स्वत: याचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. आयला रे आयला या गाण्यावर अक्षय कुमार हा चला हवा येऊ द्या च्या सेटवर नाचताना पाहायला मिळत आहे. ‘आयला रे आयला टीम ‘सूर्यवंशी’ आयला, असे कॅप्शन त्याने हा प्रोमो पोस्ट करताना दिले आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात येत्या १, २ आणि ३ नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ टीम येणार आहे. येत्या ५ नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सूर्यवंशी पाहायला विसरु नका, असेही त्याने या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच अनेक बॉलिवूड कलाकार प्रमोशनसाठी या मंचावर हजेरी लावत असतात. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील कलाकार हजेरी लावणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.