बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार गेल्या वर्षापासून एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूड गाजवत आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटापासून त्याची जी चर्चा सुरु झाली आहे, ती काही केल्या थांबत नाही. त्याचा ‘केसरी’ हा चित्रपटही आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर तो चित्रपट दिग्दर्शक एस.शंकर यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. मात्र या आगामी चित्रपटामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

एस.शंकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘इंडियन २’ असं असून हा चित्रपट १९९४ सालच्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन मुख्य भूमिकेमध्ये होते. ‘इंडियन २’ मध्येदेखील कमल हसन यांची मुख्य भूमिका असून अक्षय खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

‘इंडियन २’ हा अक्षयचा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट आहे. यापूर्वी अक्षयने एस.शंकर यांच्या ‘२.०’ या दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातदेखील तो खलनायकाच्याच भूमिकेत झळकला होता. या चित्रपटासाठी प्रथम दिग्दर्शकांनी अजय देवगणला ऑफर दिली होती. मात्र काही कारणास्तव अजयने चित्रपटासाठी नकार दिला. या काळातच ‘२.०’ चं चित्रीकरण सुरु होतं. चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि शंकर यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर शंकर यांनी अक्षयला ‘इंडियन २’ चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं.

दरम्यान, अक्षयने आतापर्यंत अभिनेता म्हणून चाहत्यांची मन जिंकली आहेत. मात्र आता खलनायकाच्या भूमिकेतही तो प्रेक्षकांना आवडत आहे, असं एकंदरीत दिसून येत आहे.

 

Story img Loader