डिजीटल प्लॅटफॉर्मचं महत्त्व वाढलं असून वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेब सीरिजचं विश्व दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये बडे कलाकारसुद्धा भूमिका साकारण्याची रुची दाखवत आहेत. डिजीटल प्लॅटफॉर्ममध्ये आता आणखी एक मोठं नाव जोडलं गेलं आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार अॅमेझॉन प्राइमद्वारे डिजीटल विश्वात पदार्पण करत आहे.
अॅमेझॉन प्राइम ओरिजीनलच्या ‘द एंड’ या सीरिजद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलरने परिपूर्ण अशी ही सीरिज असणार आहे. ‘ही अत्यंत मजेशीर आणि काल्पनिक कथा आहे. याबद्दल मी सध्या फार काही सांगू शकत नाही पण त्यात प्रेक्षकांना खूप सारं अॅक्शन पाहायला मिळणार हे नक्की,’ असं अक्षयने सांगितलं.
BIGGG NEWS… Akshay Kumar makes his debut on the digital platform with #TheEnd [working title]… Created by Abundantia… On Amazon Prime Original.
— taran adarsh (@taran_adarsh) March 5, 2019
डिजीटल विश्वात पदार्पण करण्याविषयी तो पुढे म्हणाला, ‘मला माझ्या मुलाकडून याबाबत प्रेरणा मिळाली. तरुणांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. त्यानेच मला डिजीटल प्लॅटफॉर्मवर येण्यास प्रोत्साहित केलं.’
अक्षय कुमारच्या या वेब सीरिजची निर्मिती अॅबन्डन्शिया एंटरटेन्मेंट करत आहे. या प्रॉडक्शन हाऊसने आर. माधवनच्या ‘ब्रिथ’ या सीरिजची निर्मिती केली होती.