अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशीच प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अक्षय जोरदार प्रमोशन करत आहे. ‘रक्षाबंधन’ नावाप्रमाणेच भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. चार बहिणींची जबाबदारी असलेला भाऊ म्हणजेच अक्षय कुमारचा त्यांचे पालन पोषण करतानाचा संघर्ष आणि त्यांच्या नात्यातील गोडवा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
रक्षाबंधन या सणाच्या दिवशी भावा बहिणीचे नाते साजरे केले जाते. यात मुख्य भूमिका असते ती राखीची. राखी बनवणारे कारागीर त्यांच्या कलेने वर्षभर या दिवसासाठी विविध प्रकारच्या राख्या तयार करतात. ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने संपुर्ण टीमसह जयपुरमधील अशा राखी बनवणाऱ्या कारागीरांची भेट घेतली. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या कृतीची नेटकरी प्रशंसा करत आहेत.
जयपूरमधील गोलियावास येथील राखी बनवणाऱ्या कारागीरांची अक्षय कुमारसह चित्रपटाच्या टीमने भेट घेतली. यावेळी तेथील महिलांनी अक्षय कुमारला राखी देखील बांधली. हा आपलेपणा पाहुन त्याने चाहत्यांची मन जिंकली. ‘वर्षभर काम करून रक्षाबंधन सणासाठी राख्या बनवणाऱ्या आणि त्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या गोलियावास, जयपुरमधल्या कारागीरांना आम्ही भेटलो. यांना भेटून खूप आनंद झाला.’ असे कॅप्शन अक्षयने दिले आहे.
आणखी वाचा – “तीन महिन्यात नवीन चित्रपट…” ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर निलेश साबळेने उडवली अक्षय कुमारची खिल्ली
येत्या ११ ऑगस्टला अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.