रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखादी गोष्ट सुंदर शब्दांत सांगितली तर एरव्ही काय ते असभ्य बोलणं नामक यादीत मोडणारी गोष्टही मनाला सुखावून जाते. वास्तवाकडे डोळेझाकही नको आणि ते सांगताना समोरच्या प्रेक्षकांना काय आणि कशा पद्धतीने सांगितलं म्हणजे ते जिव्हारी न लागता थेट जिवाला भिडेल याचं भान राखत केलेला चित्रपट म्हणून ‘ओह माय गॉड २’चा उल्लेख करता येईल. आत्तापर्यंत नव्यापेक्षा जुन्याचा गोंधळ बरा होता असाच अनुभव कित्येक सिक्वेलपटांबाबत आलेला असताना दशकभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’चा सिक्वेलपट स्वतंत्रपणे आणि उत्तम पद्धतीने काळानुरूप विषय हाताळण्यात यशस्वी ठरला आहे.
‘ओह माय गॉड़’ या मूळ चित्रपटाच्या कथेपेक्षा ‘ओह माय गॉड २्’ची कथा ही तुलनेने बरीच सोपी आहे असं म्हणायला हवं. मूळ चित्रपटात कांजीभाई या नास्तिक गृहस्थाचा सश्रद्ध होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. देवच न मानणाऱ्या कांजीभाईंनी आपल्या नुकसानीला जबाबदार धरत देवालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते, अशी ती कथा होती. नव्या चित्रपटात काळाचं भान आणि भवतालाबद्दल सजग असलेल्या दिग्दर्शक अमित राय यांनी देवावर नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्ताचं बोट धरूनच आपल्याला जे सांगायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत चोख पोहोचवलं आहे. लैंगिक शिक्षण हवं की नको हा मुद्दा गेली कित्येक वर्ष आपल्याकडे विविध राज्यांत, प्रांतात चघळला जातो आहे. मात्र अजूनही आपल्याकडे लैंगिकता, लैंगिक भावभावना याविषयी खुलेपणाने बोलणं हे असभ्य मानलं जातं. त्यामुळे शाळेतून त्याचं शिक्षण मिळावं यामागची तार्किक, वैज्ञानिक भूमिका लक्षात घेणं दूरच राहिलं, त्याविषयी अळीमिळी गुपचिळी राखली पाहिजे हेच धोरण.. आणि चुकून जर कोणी आपल्या लैंगिक भावभावनांविषयी बोललंच किंवा त्यासंबंधातील काही वर्तन त्याच्याकडून झालं तर तो समाजाच्या दृष्टीने असभ्य ठरतो, पापी ठरतो. आपल्या नैसर्गिक भावभावनांवर नियंत्रण नसलेला व्यभिचारी असं लेबल डकवून त्याचं खच्चीकरण केलं जातं. ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाच्या कथेत समाजाकडून असा बळी ठरवला गेला आहे तो विवेक नावाच्या शालेय विद्यार्थ्यांचा.. आठवी-दहावीत असलेल्या कुमारवयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या दिसण्या-बोलण्यापासून ते त्यांच्या पौरुषत्वाबद्दलच्या भ्रामक कल्पनांवरून अनेकदा चिडवलं जातं. पण मुळात ज्या गोष्टीवरून चिडवलं जातं आहे त्याविषयी घरच्यांशी बोलण्याची सोय नाही. मित्रांमध्ये चर्चा केली तर हसं होण्याची शक्यता अधिक.. त्यामुळे कात्रीत सापडलेली अनेक मुलं इंटरनेटपासून जडीबुटीपर्यंत विविध चुकीचे पर्याय हाताळतात आणि अधिकाधिक हताश होत जातात. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी मुलांना आणि मुलींना जवळ घेऊन स्पष्ट शब्दांत समजावून सांगणं ही काळाची गरज आहे आणि ते काम पालकांबरोबरच शिक्षकांनाही करावं लागणार आहे, यावर हा चित्रपट स्पष्टपणे भाष्य करतो. योनी, लिंग, शिश्न या शब्दांचा उच्चार, त्यांची चित्रं दाखवून रचना-कार्य समजावून सांगणं म्हणजे असभ्य वा अश्लीलता नाही हे ठळकपणे लेखक – दिग्दर्शक अमित राय यांनी मांडलं आहे.
अर्थात इतका वादविवादाचा आणि गंभीर आशय असलेला विषय मांडणारा चित्रपट म्हणजे तो अतिगंभीर आणि उपदेश देणारा किंवा सतत मोठमोठय़ा संवादातून काहीतरी संदेश देणारा चित्रपट असेल अशी भावना होऊ शकते. मात्र इथेही दिग्दर्शक अमित राय यांनी वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या शैलीत आणि तरीही हलक्याफुलक्या खेळकर पद्धतीने हा विषय रंगवला आहे. मुळात या चित्रपटाचा नायक विवेकचे वडील कांती मुद्गल शरण हे महाकाल मंदिराजवळ असलेल्या पूजाभांडार दुकानात काम करणारा साधासरळ सज्जन गृहस्थ आहे. शिवभक्त असलेल्या कांतीला मुलाची ससेहोलपट समजते आहे, पण तोही परंपरागत समाजातच लहानाचा मोठा झाला असल्याने या परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचं ज्ञान त्याच्याकडे नाही. अशी व्यक्ती गरज पडली तर काय काय साधनं हाताशी घेत आपल्या मुलासाठी लढायचा प्रयत्न करेल? या एका साध्या सूत्रातून चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे मुळात कांतीचं अज्ञान, त्याच्यापुढे शाळेची वकील म्हणून उभी राहिलेली हुशार कामिनी आणि एकूणच सत्र न्यायालयात उभा राहिलेला खटला या रचनेचा पुरेपूर फायदा घेत अमित राय यांनी ही गोष्ट हुशारीने उभी केली आहे. या चित्रपटात देवदूताच्या तोंडी एक वाक्य आहे, एखादी गोष्ट चांगल्या शब्दांत सांगितली की ती कानाला गोड लागते. ते व्यावहारिक चातुर्य या चित्रपटाच्या कथारचनेतच लेखक म्हणून अमित राय यांनी दाखवलं आहे. त्याची मांडणीही कथेबरहुकूम आहे आणि कलाकारांची निवडही तितकीच चोख केली आहे.
चित्रपटात अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहे, मात्र म्हणून त्याचा ठायी ठायी वावर आणि विनाकारण चमत्कारिक संवाद-हावभाव असं काहीही यात दिसत नाही. त्याउलट, गरजेपुरता होणारा त्याचा खेळकर आश्वासक प्रवेश, मोजकेच संवाद आणि एकूणच त्याची शिवदूताला साजेशी थोडीशी गूढ चमत्कारिक देहबोली यामुळे चित्रपटात गंमत आली आहे. देशभरात कुठल्याही प्रांतात सापडेल असा सर्वसामान्य माणूस त्या त्या प्रदेशाचा म्हणून दिसून येणारा स्थायीभाव, संवादाचा लेहजा पकडत व्यक्तिरेखा साकारणं ही अभिनेता पंकज त्रिपाठी यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांनी साकारलेला कांती कुठेही कंटाळवाणा वाटत नाही की त्याचा राग येत नाही. पंकज त्रिपाठींसमोर आव्हान म्हणून उभी राहिलेल्या कामिनीच्या भूमिकेत यामी गौतम चपखल बसली आहे. आरुष शर्मा यानेही विवेकची भूमिका सहजपणे केली आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेत अभिनेता पवन मल्होत्रा यांनी रंगत आणली आहे. चित्रपटात दोनच गाणी आहेत, दोन्हींचं चित्रण वेगळं आहे. दोन्ही चित्रपटांचा विचार करायचा म्हटलं तर ‘ओह माय गॉड’ हा पटकथा-दिग्दर्शनाच्या दृष्टीने अधिक आव्हानात्मक होता. त्या तुलनेत ‘ओह माय गॉड २’ हा साधासोपा असला तरी अत्यंत हुशारीने मांडणी केलेला चित्रपट आहे यात शंका नाही.
ओह माय गॉड २
दिग्दर्शक – अमित राय कलाकार – अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम, पवन मल्होत्रा, गोिवद नामदेव, आरुष शर्मा, अरुण गोविल.