खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सपशेल आपटले आहेत. बॉयकॉट ट्रेंडमुळे अक्षयच्या चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. आता अक्षय पुन्हा एक नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सिनेअभ्यासक आणि तज्ञ तरण आदर्श यांनी याविषयी खुलासा केला आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतु’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तरण आदर्श यांनी चित्रपटाचं पोस्टर ट्वीट करत ही बातमी दिली आहे. येत्या दिवाळीला म्हणजेच २५ ऑक्टोबरला ‘राम सेतु’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच या चित्रपटाची पहिली झलक आज दुपारी बघायला मिळेल असंही त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजता या चित्रपटाची पहिली झलक, टीझर किंवा मोशन पोस्टर आपल्याला बघायला मिळू शकतं.
कालच जागतिक कन्या दिनानिमित्त अक्षय कुमारनेही तिच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिच्याबद्दल एक भावून पोस्टही त्याने ट्विटरवर शेअर केली होती. याच ट्वीटमध्ये त्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे अक्षयच्या ट्वीटपासूनच लोकांना त्याच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा : आर. बाल्की यांना अशी सुचली होती ‘चूप’ची कथा, दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा याने केले असून त्याने याअगोदर ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘परमाणु’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘राम सेतु’मध्ये अक्षयबरोबर नुशरत भरूचा आणि जॅकलीन फर्नांडिस या अभिनेत्रीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या नावावरून आणि एकूणच संकल्पनेवरुन मध्यंतरी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता पण आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.