यंदाची दिवाळी ही प्रेक्षकांसाठी खास ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे दिवाळीनिमित्त दोन हिंदी बिग बजेट चित्रपटांसह मराठीमधील बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. ‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तर ‘हर हर महादेव’चा ट्रेलर पाहता प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधील काही सुवर्णक्षण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतरच चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात येते. दोन बिग स्टार्सच्या चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे.
‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. पण ॲडव्हान्स बुकिंग सुरु केल्यानंतरही आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘राम सेतू’ व ‘थॅंक गॉड’ला थंड प्रतिसाद मिळत आहे. ‘राम सेतू’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फक्त पाच ते आठ कोटी रुपये कमाई करणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
आणखी वाचा – Video : भांडूपच्या चाळीत राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
तर अजय देवगणच्या ‘थॅंक गॉड’लाही सध्या प्रेक्षकांच्या कमी प्रतिसाद मिळत असल्याचं बोललं जात आहे. या दोन चित्रपटांच्या तुलनेमध्ये मराठीमधील ऐतिहासिक ‘हर हर महादेव’ चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर अशी मराठीमधील तगडी स्टारकास्ट आहे. आता या तीन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.