अभिनेता अक्षय कुमारचे मागील गेल्या दोन वर्षात प्रदर्शित झालेले चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले. त्याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने तर प्रेक्षकांचा अपेक्षाभंगच केला. काही दिवसांपूर्वीच अक्षयने त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाची घोषणा केली. आता या चित्रपटाचं पोस्टर अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. तसेच आज या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप, तरीही अक्षयने घेतला मोठा निर्णय, आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ला देणार टक्कर
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. “प्रेम, कुटुंब आणि कधीही न तुटणारं बंधन दाखवणारी ही कथा आहे. या सेलिब्रेशनमध्ये तुम्हीही सहभागी व्हा.” असं अक्षयने पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे. पण अक्षयचा या चित्रपटामधील लूक नेटकऱ्यांच्या काही पसंतीस पडला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. ट्विटरद्वारे नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या.
एका युजरने म्हटलं की, “हा चित्रपट सुपरफ्लॉपच होणार.” तर दुसऱ्या युजरने त्याच्या लूकबाबत कमेंट करत म्हटलं की, “या लूकसाठी खोटी मिशी लावण्याची काय गरज होती.” चित्रपटाच्या माध्यमातून तू चाहत्यांची निराशा करत आहेस असं देखील काही जणांनी म्हटलं आहे.
नेटकऱ्यांच्या या वेगवेगळ्या कमेंटमुळे पुन्हा एकदा ‘सम्राट पृथ्वीराज’ सारखाच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरणार का? असे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात आहेत.
त्याचबरोबरीने अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. तर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटही ११ ऑगस्टलाच प्रदर्शित होत आहे. म्हणजेच यावेळी अक्षय विरुद्ध आमिर असं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. पण या दोघांपैकी कोणाचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अधिक गर्दी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.