पूर्वी नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये गायक नट असायचे. म्हणजे मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांना गाता यायला पाहिजे ही आवश्यक अट होती. त्याकाळी ती गरज होती आता मात्र हौस म्हणून जवळपास प्रत्येक अभिनेता आपल्या चित्रपटातून एकतरी गाणे गाण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. मग कधी तो त्याचा अट्टहास असतो, कधी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांची इच्छा असते तर कधी कथानकाची गरज असते. पण, अभिनयाबरोबरच गाणे गाण्याची ही टुम सध्या वाढतच चालली आहे. अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, धनुष, ह्रतिक रोशन, अभय देओल, रणबीर कपूर आणि आता अक्षय कुमारही. नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल २६’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारने रोमॅंटिक गाणे गायले आहे.
पाककलेत निपुण आणि कराटेत मास्टर असलेल्या अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारला गायन कलाही अवगत आहे की काय, अशी शंका येणे साहजिक आहे. हिंदी चित्रपटात हिरो नेहमी अष्टपैलू असतो. मात्र, पडद्यावरचा हा अष्टपैलूपणा आता वास्तवातही असावा, यासाठी प्रत्येक नायकाचा प्रयत्न सुरू असतो. अक्षयने या चित्रपटात गाणे गावे तेही रोमॅंटिक गाणे गावे, ही दिग्दर्शक नीरज पांडेची इच्छा होती. त्याने अक्षय कुमारला यासाठी गळ घातली. पण, आपल्या आवाजाची कल्पना असलेल्या अक्षयने नकारघंटा वाजवली तरीही महिनाभर नीरजने त्याच्याकडे गाण्याचा तगादा लावला होता. सरतेशेवटी आपल्या दिग्दर्शकाची इच्छा मान्य करत अक्षयने होकार दिला. त्यानंतर, मुळातच गायनाचे अंग नसल्याने अक्षयपुढे मोठी अडचण होती. म्हणून त्याने गायनाचे शिक्षण सुरू केले. पाच महिन्याच्या अभ्यासानंतर चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एम. एम. करीम यांना आपण गाण्यासाठी तयार असल्याचे अक्षयने सांगितले. खास या चित्रपटासाठी करीम यांनी अक्षयकडून रोमॅंटिक गाणे गाऊन घेतले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अक्षयने इतके चांगले गाणे गायले आहे, यावर युनिटनेही आश्चर्य व्यक्त केले. खुद्द दिग्दर्शक नीरजनेही अक्षयने फारच सुंदर गाणे गायले असल्याची कबूली दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी कित्येक चित्रपटातून गाणी गायली आहेत. मात्र, आत्ता फरहान, ह्रतिक, रणबीरपासून अगदी आयुषमान खुराणासारख्या नवोदित कलाकारानेही गाणे गायले आहेत. असेच प्रत्येकजण गाणे गात सुटला तर गायक नटांची परंपरा पुन्हा सुरू होईल.

Story img Loader