अक्षय कुमारच्या आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण अक्षयबरोबर अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाबरोबर प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि आमिर या दोनही दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट ११ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होतील. यामुळे नक्की कोणता चित्रपट अधिक चालणार? किंवा कोणत्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत आता अक्षयने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
आणखी वाचा – विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधणाऱ्या ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याचा गृहप्रवेश, शेअर केली खास पोस्ट
‘रक्षाबंधन’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अक्षयने एकाचवेळी दोन चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत आपलं मत मांडलं. आमिरच्या चित्रपटाबरोबर ‘रक्षाबंधन’ही प्रदर्शित होत असल्याने याबाबतच अक्षयला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, “बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची टक्कर होणार असं काहीच नाही. फक्त दोन उत्तम चित्रपट एकत्रच प्रदर्शित होत आहेत. हा एक मोठा दिवस असेल. करोनामुळे बरेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सगळेच वाट पाहत आहेत. पुढेही काही चित्रपट एकत्र प्रदर्शित होतील. अशी आशा आहे की दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळेल.”
आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ची कथा ही भाऊ-बहिणीच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. आपल्या चार बहिणींची लग्न, कौटुंबिक जबाबदारी आणि प्रेमामध्ये अडकलेला भाऊ याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. तर आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटासाठी आमिरने बरीच वर्ष मेहनत घेतली आहे.
आणखी वाचा – सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप, तरीही अक्षयने घेतला मोठा निर्णय, आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ला देणार टक्कर
आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. तर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. म्हणजेच यावेळी अक्षय विरुद्ध आमिर असं चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे. पण या दोघांपैकी कोणाचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये अधिक गर्दी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.