अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या बिग बजेट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याच्या हाती सध्या बरेच हिंदी चित्रपट आहेत. एकाच वेळी दोन ते तीन चित्रपटांवर काम करणं अक्षयला उत्तम जमतं. इतकंच नव्हे तर कोविडच्या काळात देखील त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली होती. अक्षय कोविड काळात आपल्या चित्रपटांची तयारी करत असताना त्याला करोनाची लागण देखील झाली होती. यावर उपचार करत तो बरा झाला. पण आता पुन्हा एकदा त्याला करोनाची लागण झाली आहे.
अक्षयने एक ट्विट करत याबाबत माहिती दिली. “कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण मला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. म्हणूनच मी आता आराम करणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मी तिथे असणं खूप मिस करेन.” अशाप्रकारचं ट्विट अक्षयने केलं आहे.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या लेकाचं सोशल मीडियावर कमबॅक, आर्यनने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
एप्रिल २०२१मध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याने काही दिवस कामामधून ब्रेक घेत आराम केला होता. आता पुन्हा एकदा त्याला याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. शिवाय त्याला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवालाही जाता येणार नाही. यावर्षी या चित्रपट महोत्सवाला जाण्यासाठी अक्षय फार उत्सुक होता. मात्र आता ते त्याला शक्य नसल्याचं अक्षयने सांगितलं आहे.
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Cannes Film Festival 2022) कलासृष्टीमधील बरीच मंडळी हजेरी लावणार आहेत. यामध्ये पुजा हेगडे, एआर रेहमान, शेखर कपूर यांसारख्या अनेक मंडळींचा समावेश आहे. तसेच दीपिका पदुकोणही चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार आहे. येत्या १७ मे रोजी या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अनेक कलाकार मंडळींचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. पण यंदा अक्षय या सुवर्णसंधीला हुकला आहे.