पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ्यांवर केलेली कारवाई, या सर्व गोष्टींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशा वातावरणातही अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन केल्याने चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या बुधवारी ‘केसरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘सानू केहंदी’ प्रदर्शित झाला. त्यानंतर अक्षय आणि ‘केसरी’चा निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर या गाण्याला शेअर करत त्याचं प्रमोशन केलं आणि चाहत्यांना हेच रुचलं नाही. सोशल मीडियावर अक्षय कुमारवर जोरदार टीका झाली.

देशात एकीकडे तणावाची परिस्थिती असताना, सीमेवर जवानांचे प्राण जात असताना तू तुझ्या चित्रपटाचं प्रमोशन काही दिवस पुढे ढकलू शकत नाही का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी अक्षयला विचारला. ‘आम्ही तुझे चाहते आहोत पण देशात असं वातावरण असताना फक्त आपला वैयक्तिक विचार करणं योग्य नाही,’ असंही एका युजरने लिहिलं. त्यामुळे अक्षयने चित्रपटातील गाण्याचं प्रमोशन करून चाहत्यांची चांगलीच नाराजी ओढवून घेतली आहे.

‘केसरी’ हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. यामध्ये अक्षयसोबतच परिणीती चोप्राची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. १० हजार सैन्याच्या रुपानं मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी शेवटच्या श्वसांपर्यंत लढा देत आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केलं. ही शौर्यगाथा ‘केसरी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

Story img Loader