‘नमस्ते लंडन’च्या दमदार यशानंतर आता दिग्दर्शक विपुल शाह ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अर्जुन कपूर- परिणीती चोप्रा ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘इश्कजादे’ चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा दिसली होती. मात्र ‘नमस्ते इंग्लंड’साठी विपुल शाह यांची पहिली पसंती ही अर्जुनला नव्हतीच.
विपुल शाह यांनी स्वत: हे मान्य केलं. ‘नमस्ते इंग्लंड’मध्ये अक्षयनेच महत्त्वाची भूमिका साकारावी असं विपुल शाह यांना मनापासून वाटत होतं. मात्र अक्षय त्यांच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. तसेच अक्षयच्या तारखा उपलब्ध नसल्यानं अर्जुनला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं. खरं तर ‘नमस्ते लंडन’मध्ये अक्षय आणि कतरिना ही जोडी पाहायला मिळाली होती. चित्रपट तर यशस्वी झालाच पण अक्षय आणि कतरिना ही जोडी देखील हिट झाली. म्हणूनच अक्षयनं ‘नमस्ते इंग्लंड’मध्येही आपली साथ द्यावी अशी विपुल यांची इच्छा होती. अर्जुनलाही याची कल्पना होती पण अक्षयनं नकार दिल्यानंतर अर्जुन हा चित्रपट करायला तयार झाला असंही ते म्हणाले. १९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.