करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आपला आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’चं शूटिंग पूर्ण केलंय. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरचे काही BTS फोटोज त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर चक्क दिल्लीतील प्रसिद्ध चांदनी चौकचं रिक्रीएशन करण्यात आलं. याचे काही निवडक फोटोज अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार भावूक झाला होता. सेटवरील चांदनी चौकचं रिक्रीएशन पाहून त्याने दिल्लीतल्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीतील चांदनी चौक आणि अक्षय कुमारचं खूप जुनं नातं आहे.
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो आनंद एल. रायसोबत चालताना गप्पा मारताना दिसून येतोय. दोघांच्या या फोटोला मोनोक्रोम करण्यात आलंय. तर दुसऱ्या कलरफुल फोटोमध्ये एका स्कुटीवर अक्षय कुमार, आनंद एल. राय आणि भूमी पेडणेकर हे तिघे बसलेले दिसून येत आहेत. हे फोटोज शेअर करताना अभिनेता अक्षय कुमारने एक इमोशनल पोस्ट देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “चांदनी चौकच्या रस्त्यावर चालणं खूप मिस करत होतो. पण मुंबईत माझ्या चित्रपटाच्या टीमने इतकं सुंदर सेट बनवलं की ते पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चित्रपटाच्या सेटवर हुबेहुब दिल्लीतील चांदनी चौक बनवलं होतं. सुमित बासु तुम्ही बनवलेला हा सेट अगदी खराखुरा चांदनी चौक वाटतोय. माझ्यासोबतची शानदार को-स्टार भूमी पेडणेकर हिने देखील आपल्या टॅलेंटने संतुलन राखल्याबद्दल तिचे सुद्धा खूप आभार…आनंद सर, तुमच्याबद्दल काय बोलू शकतो? तुम्ही एक जादूगार आहात आणि आज जे आपण रक्षाबंधन चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतोय, मला जाणिव होतेय की यातून मी एक उत्तम कलाकार बनून हा सेटचा निरोप घेतोय.”
अक्षय कुमारने हे दोन्ही फोटोज शेअर केल्यानंतर त्याच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स करण्यात सुरूवात केली. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने त्याचं ५ किलो वजन वाढवलं आहे. म्हणून या फोटोंमध्ये त्याचा लुक काहीसा वेगळा दिसून येतोय.
‘रक्षाबंधन’ चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर सोबत आणखी पाच चेहरे झळकणार आहेत. यात तिने अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारलीय. येत्या रक्षाबंधनच्या निमित्ताने हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. करोनाच्या लाटेमुळे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बराच उशीर झाला होता. पण अनेक समस्यांचा सामना करत अखेर आज या चित्रपटाचं शूटिंग आटोपलं आहे.