अभिनेता अक्षय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काल बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा ५५ वा वाढदिवस होता. अक्षयने कुटुबांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. अनेक सेलिब्रिटींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विकंल खन्नासह अजय देवगन, करिना कपूर, वानी कपूर, रकुल प्रीत सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा अशा बऱ्याचशा सेलिब्रिटींनी अक्षयसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
अक्षय कुमार सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘वर्ष निघून जातं, काळ पुढे जात राहतो.. कृतज्ञता ही एक अशी गोष्ट आहे जी कायम राहते. वाढदिवसाच्या दिवशी दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार.’ असे कॅप्शन दिले आहे. अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘कटपुतली’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
दरम्यान अक्षयला शुभेच्छा देणाऱ्या एका सेलिब्रिटीच्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेता सुनील शेट्टीने अक्षय कुमारला शुभेच्छा देत त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “कसं काय राजू!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रे बाबा!!” असे सुनीलने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये सुनील आणि अक्षय यांचे अनेक फोटो असून व्हिडीओला त्यांच्या ‘हेरा फेरी’ चित्रपटामधील ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ हे गाणं जोडलेलं आहे. हा व्हिडीओ रिशेअर करताना अक्षयने “श्याम भाई, शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा हेरा फेरी करुयात का ?” असे म्हटले आहे. यावरुन सोशल मीडियावर ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा ‘हेरा फेरी’ हा सुपरहिट विनोदी चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून चाहते हेरा फेरी फ्रेन्चायझीतील तिसऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. परेश रावल यांनीही ‘हेरा फेरी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. २०२१ मध्ये हेरा फेरी फ्रेन्चायझीच्या निर्मात्यांनी, फिरोझ नाडियादवाला यांनी बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हेरी फेरी ३ ची घोषणा केली होती. सुनीलने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे हेरा फेरी ३बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.