बॉलिवूडचा वादग्रस्त अभिनेता संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडलेच पण त्याचबरोबर रणबीर कपूरच्या करिअरलाही या चित्रपटामुळे कलाटणी मिळाली. या चित्रपटात रणबीरसोबतच विकी कौशल, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा यांसारखे अनेक कलाकारही होते. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना याच्या वाट्यालाही महत्त्वाची भूमिका आली होती, मात्र काही कारणामुळे अक्षय खन्ना या चित्रपटाला मुकला.

या चित्रपटात सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी आधी अक्षयच्या नावाचा विचार केला गेला होता. अक्षयनं सुनील दत्त यांची भूमिका साकारावी असं राजकुमार हिरानी यांना वाटत होतं. मात्र लूक टेस्टमध्ये अक्षय पास होऊ शकला नाही. त्यामुळे ही भूमिका पुढे परेश रावल यांच्या वाट्याला आली असं अक्षयनं एका मुलाखतीत सांगितलं.
अक्षय ‘द अॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो संजय बारू यांची भूमिका साकारत आहे. संजय बारू हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे त्याकाळचे माध्यम सल्लागार होते. त्यांच्याच वादग्रस्त ‘द अॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर’ या कांदबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे.

Story img Loader