‘ग्रेझिंग गोट’चा सहनिर्माता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी ‘ओ माय गॉड’ (ओएमजी) या पहिल्या यशस्वी चित्रपट निर्मितीनंतर प्रथमच प्रादेशिक भाषेतील ‘७२ मैल: एक प्रवास’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित करीत आहेत.
‘७२ मैल: एक प्रवास’ हा चित्रपट म्हणजे स्वत्वाच्या शोधात निघालेल्या अशोक नावाच्या एका तरूणाच्या प्रवासाची मर्मभेदी कथा आहे. ज्यात गावाकडील या तरूणाच्या प्रवासादरम्यान निर्माण होणारे नातेसंबंधही दाखविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटातील प्रमुख पात्र अशोकचे स्वातंत्र्योत्तर भारतातील अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला असून, ‘७२ मैल: एक प्रवास’ याच नावाच्या कादंबरीवर आधारीत या चित्रपटात राधाक्का नावाच्या महिलाचा अशोकवर असलेला प्रभाव दाखविण्यात आला आहे.
अशोक वाटकर यांच्या आत्मचरित्राचा समग्र अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल, याची अक्षयकुमार आणि अश्विनीला खात्री आहे.
दर्जेदार आणि विषयाला धरून चित्रपटाची निर्मिती करीत’ ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ हिंदी तसेच प्रादेशिक भाषांतील नवनवीन प्रोजेक्ट हाती घेत चित्रपट क्षेत्रात नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडच्या काळातील विचारांना प्रवृत्त करणा-या, आदर्श आणि भावनाप्रधान चित्रपटांमुळे भौगोलिक सीमारेषा आणि पिढ्यांमधले अंतर पुसले गेले आहे. याच धर्तीवर विशिष्ठ संकल्पनेवर आधारित देश आणि विदेशातील प्रेक्षकांना एकत्र आणू शकतील, अशा विविध चित्रपटांची निर्मिती ‘ग्रेझिंग गोट पिक्चर्स’ तर्फे केली जाणार आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘७२ मैल: एक प्रवास’ हा आमचा पहिलाच प्रादेशिक भाषेतील चित्रपट असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. मराठी जरी माझी पहिली भाषा नसली, तरी अनेक वर्षे मुंबईमध्ये राहिल्यामुळे मी ही भाषा पटकन आत्मसात करण्यात यशस्वी ठरलो आणि येथील संस्कृतीचा एक भाग झालो. काही लक्षवेधी मराठी चित्रपट माझ्या पाहण्यात आले आहेत आणि मला ते खूप आवडले. ‘७२ मैल: एक प्रवास’ची कथा माझ्या हृदयाला भिडली आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल.
याच विषयी बोलतांना अश्विनी म्हणाली, विशिष्ट काळाचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट बनवणे हे माझे स्वप्न होते आणि ‘७२ मैल: एक प्रवास’मुळे मला ते साकार करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा विषय आणि स्थळ हे विचारांना प्रवृत्त करणारे असून, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. प्रेक्षकांचे यातील पात्रांसमवेत नाते निर्माण होते आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या ‘जोगवा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. अक्षय कुमार आणि मला आम्हा दोघांना ‘७२ मैल: एक प्रवास’ सारखा सुंदर चित्रपट निर्माण करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे. जरी हा चित्रपट प्रादेशिक भाषेतला असला, तरी निश्चितपणे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि त्यांना आपली परंपरा आणि संस्कृती यांची ओळख घडवेल, तसेच स्वातंत्र्योत्तर भारताचे दर्शन घडवेल याचा मला विश्वास आहे. मला खात्री आहे की मराठी प्रेक्षकांना या चित्रपटाचा नक्कीच अभिमान वाटेल.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
अक्षय कुमारचा ‘७२ मैल: एक प्रवास’ २६ जुलै रोजी चित्रपटगृहात
'ग्रेझिंग गोट'चा सहनिर्माता अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी 'ओ माय गॉड' (ओएमजी) या पहिल्या यशस्वी चित्रपट निर्मितीनंतर प्रथमच प्रादेशिक भाषेतील '७२ मैल: एक प्रवास' हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित करीत आहेत.
First published on: 28-05-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshays debut marathi venture 72 miles ek pravas to release in july