गणेशोत्सवात जल्लोष आणि उत्साहात वाजवली जाणारी गणपतीची गाणी हा अविभाज्य घटक असतो. दर वर्षी गणपतीची अधिकाधिक लोकप्रिय गाणी ऐकायला मिळतात. या वर्षीही ‘बायकर्स अड्डा’ या मराठी चित्रपटातील ‘आला रे आला बाप्पा तू आला’हे गणपतीच्या जयघोषाचं जोशपूर्ण गीत गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे.
प्रशांत हळवे लिखित ‘आला रे आला बाप्पा तू आला’ या मराठमोळ्या गीताला वेस्टर्न स्टाईल टच देण्यात आला असून मराठीतला रॉक स्टार जसराज जोशीच्या दमदार आवाजात हे गीतं ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीच्या या गाण्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक गिटारची धून ऐकायला मिळणार आहे.विशी-निमो या संगीतकाराने या गीताला ठेकेदार संगीत दिलं आहे. विशी-निमो याचा स्वतःचा रॉकबँड असल्यामुळे ह्या गीताला वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली आहे.
संतोष जुवेकर,श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, हृषीकेश मांडके या चार जणांवर चित्रित करण्यात आलेल्या या गीताचं नृत्य दिग्दर्शन संतोष पालवणकरने केले आहे. हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध गोखले नगर मंडळ या ठिकाणी शूट करण्यात आले आहे. प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘बायकर्स अड्डा’मध्ये संतोष जुवेकर, प्रार्थना बेहेरे, श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे,देवेंद्र भगत, तन्वी किशोर, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, आणि निखिल राजेशिर्के आदिंच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील. ‘बायकर्स अड्डा’चित्रपट ९ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा