दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट तसेच यातील गाणी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आहे. पुष्पा या चित्रपटाच्या यशाचा आणि अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेचा फायदा घेत आणखी एक तेलुगू चित्रपट हिंदीत डब केला जाणार आहे. ‘अला वैकुंठापुरामुलू’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीत डब करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीला अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी डब केलेला चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.
सध्या संपूर्ण भारतात पुष्पा चित्रपटातील गाणी आणि अल्लू अर्जुनच्या स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. या चित्रपटातील गाण्यांवर अनेकजण रिल्स तयार करत आहे. त्याचे मिम्सही व्हायरल होत आहे. त्यानतंर आता अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बुट्टा बम्मा’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरामुलू’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो सुपरहिट ठरला होता.
सध्या ‘अला वैकुंठापुरमलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक अभिनेता कार्तिक आर्यन करत आहे. कार्तिक आर्यनला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने हा चित्रपट त्याच्या हृदयाच्या खूप जवळचा असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते.
‘अला वैकुंठपुरामुलू’ हा एक व्यावसायिक मनोरंजन करणारा चित्रपट होता. यात अल्लू अर्जुन, पूजा हेगडे आणि समुथिराकणी हे तिघेजण मुख्य भूमिकेत झळकले होते. त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यासोबत या चित्रपटात तब्बू, जयराम, सुशांत, निवेथा पेथुराज, नवदीप आणि राहुल रामकृष्ण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.