‘अरेबियन नाईट्स’ या कथासंग्रहातून आलेली ‘अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’ ही कथा जगातील सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक आहे. आत्तापर्यंत या कथेवर अनेक प्रयोग झाले आहेत. अनेक लेखक, दिग्दर्शकांनी पुस्तक, कॉमिक्स, कार्टून, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून कथेत थोडय़ाफार प्रमाणात फेरबदल करून वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहे. आता पुन्हा एकदा तोच जुना खेळ नव्याने खेळण्याचा प्रयत्न दिग्दर्शक गाय रिची करत आहे. आणि या खेळाची सुरुवात त्याने महाराष्ट्रातून केली आहे. रिची आपल्या अगामी चित्रपट ‘अल्लाउद्दीन’मधील कलाकारांच्या शोधासाठी इतरत्र कुठेही न जाता थेट महाराष्ट्रात आला आहे. त्याने आजवर ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द नेमसेक’, ‘लायन’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे कास्टिंग केले आहे. त्याचे चित्रपट काल्पनिक कथांवर आधारलेले असूनही ते वास्तवाची आणि माणसाच्या प्रवृत्तींची ओळख करून देतात. पण तरीही त्याने कलाकारांच्या निवडीसाठी थेट इथे येण्याचे कारण लक्षात येत नाही. त्याच्या मते भारतात अनेक उत्तम कलावंत आहेत. तसेच चित्रपटातील व्यक्तिरेखांची मांडणी पाहता त्यात एखादा युरोपियन कलावंत योग्य ठरणार नाही आणि भारत वगळता इतरत्र कुठेही आपल्याला अपेक्षित कलाकार मिळणे कठीण आहे, असे तो म्हणतो.