जगप्रसिद्ध गायिका दुआ लिपा ३० नोव्हेंबरला मुंबईत पोहोचली. झोमॅटो फीडिंग इंडिया कॉन्सर्ट २०२४मध्ये दुआने जबरदस्त परफॉर्मन्स केला. दुआ लिपाचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उद्योगपती मुकेश अंबानींची सून राधिका अंबानी, ईशा अंबानी, अभिनेत्री नम्रता शिरोकडकर असे अनेक सेलिब्रिटी दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये पाहायला मिळाले. या कॉन्सर्टमधील एका व्हिडीओची सध्या खूप चर्चा सुरू असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
दुआ लिपाने तिच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील ‘वो लडकी जो सबसे अलग है’ गाण्यांबरोबर आपल्या ‘लेविटेटिंग’ गाण्याच्या मॅशअपवर परफॉर्म केलं. हे पाहून शाहरुख खानच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून शाहरुखची लेक सुहाना खान देखील भारावून गेली. तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. पण, या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला. प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आणि त्यांचा मुलाने नाराजी व्यक्त केली.
दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये ‘वो लडकी जो सबसे अलग है’ गाणं परफॉर्मन्स केलं, पण याचं क्रेडिट अभिजीत भट्टाचार्य यांना दिलं गेलं नाही. त्यामुळे अभिजीत भट्टाचार्य यांनी संताप व्यक्त केला. मात्र, यावर अजूनही दुआ लिपा किंवा तिच्या टीमने प्रतिक्रिया दिली नाही. पण, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानचं गाणं का परफॉर्म केलं? यामागचं कारण दुआ लिपाने सांगितलं आहे.
लाइव्ह कॉन्सर्टमधील दुआ लिपाचा शाहरुख खानच्या गाण्यावर परफॉर्मन्स करतानाचा व्हिडीओवर @thesunshineladki या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. “मला विश्वासच बसतं नाही की दुआ लिपाने हे केलं”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. याच व्हिडीओवर दुआ प्रतिक्रिया देत म्हणाली, “या गाण्याने खूपच मजा आली.”
दरम्यान, डिजे रुचिर कुलकर्णीने २०२२मध्ये दुआ लिपाच्या ‘लेविटेटिंग’ आणि शाहरुख खानच्या ‘वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्यांचं मॅशअप केलं होतं. जे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं. त्यानंतर अनेक चाहत्यांनी दुआकडे हे मॅशअप परफॉर्म करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा – Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”
अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दुआ म्हणाली होती की, जेव्हा मी ‘लेविटेटिंग’ आणि शाहरुख खानच्या ‘वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्याचं मॅशअप पाहिलं तेव्हा मी भारावून गेले होते. हे जबरदस्त होतं. तसंच माझा बॉलीवूडचा आवडता अभिनेता शाहरुख खान आहे.