सध्या चर्चेत असलेले आणि रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेले रत्नाकर मतकरी यांचे ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक बाल रसिकांसाठी पुन्हा एकदा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. रत्नाकर मतकरी यांनी ‘हॅन्स अ‍ॅण्डरसन’ या जगविख्यात परीकथा लेखकाच्या ‘दि टीडर बॉक्स’ या परीकथेवर आधारित ‘राजकन्या आणि जादूची आगपेटी’ हे नाटक लिहिले. नंतर त्यात बरेच फेरबदल करून त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली लिहिले. हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आणि आता या नाटकाने ७५व्या प्रयोगापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे २०१८ मध्ये या नाटकाचे नव्या संचातील प्रयोग सुरू झाले; आणि गेल्या दोन महिन्यांत या नाटकाने बालप्रेक्षकांची मने जिंकली. रविवारी, ८ जुलै २०१८ रोजी या नाटकाचा ७५वा प्रयोग शिवाजी मंदिर येथे सकाळी ११.०० वाजता सादर होणार असून ‘अलबत्या गलबत्या’ या नाटय़संहितेची नवीन आवृत्ती या प्रयोगात प्रकाशित होत आहे. या वेळी रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ आणि ‘झी वाहिनी’चे नीलेश मयेकर उपस्थित राहणार आहेत. या नाटकाची नाटय़संहिता प्रथम ‘पॉप्युलर प्रकाशन’ने १९७३ साली प्रकाशित केली होती. आता नव्या मुखपृष्ठासह नवीन मांडणीतील ही आवृत्ती बालरसिकांना नक्कीच आकर्षित करणारी आहे.

नुकताच रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या एकूण बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला. बालरंगभूमीवरील त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला आहे. मराठी बालरंगभूमी केवळ टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर आपल्या अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या साहाय्याने तिला सोनेरी दिवस प्राप्त करून देण्याचे सारे श्रेय मतकरींनाच जाते. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली प्रथम रंगभूमीवर आले, मात्र पंचेचाळीस वर्षांनंतरही त्यातील ताजेपणा कायम आहे. हीच मतकरींच्या लेखणीची खरी किमया आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Albatya galbatya marathi natak
Show comments