साठ-सत्तरच्या दशकांत मराठी रंगभूमीवर बालनाटय़ चळवळ ऐन भरात होती. रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर या मंडळींनी जाणीवपूर्वक लहान मुलांच्या विश्वात डोकावणारी, त्यांच्या उपजत कल्पकतेला चालना देणारी, त्यांचं उत्तम रंजन करणारी बालनाटय़ं रंगभूमीवर आणली. या बालनाटय़ांनी कलावंतांच्या दोन-तीन पिढय़ा तर घडवल्याच; शिवाय मुलांना नाटकाची आवडही लावली; ज्याचं फलित म्हणजे पुढे मुख्य धारा रंगभूमीच्या सुजाण प्रेक्षकांची जडणघडण झाली. मुलांना अद्भुतरम्य गोष्टी आवडतात. त्याला खतपाणी घालणारी; त्याचवेळी त्यांच्यावर मूल्यसंस्कार करणारी ही बालनाटय़ं असत. ग्रिप्स थिएटर हेसुद्धा हेच काम करतं. परंतु त्यात मुलांना वास्तवाची जाणीव करून देण्याची निकड अधिक असते. मुलांना त्यांच्या भोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आणि त्या अनुषंगाने त्यांना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल, त्यांच्या अंतर्मनात चालणाऱ्या द्वंद्वाबद्दल त्यांतून भाष्य असतं.. मार्गदर्शन केलेलं असतं. वाढत्या वयात मुलांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांतून असतो. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न असतो. या दोन प्रकारच्या नाटकांत काही मूलभूत फरक आहेत. पहिल्यात मुलांच्या भूमिका सहसा मुलंच करतात, तर ग्रिप्स थिएटरमध्ये मुलांच्या भूमिकाही प्रौढ कलावंतच साकारतात. या नाटकांतून मांडलेले प्रश्न मुलांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या समजुतीतूनच सोडवण्याचा प्रयत्न असतो. या दोन्ही प्रकारच्या नाटकांतून मुलांचं मनोरंजन होतंच; पण ग्रिप्सच्या नाटकांतून त्यांना भोवतालचं जग समजून घेण्याची समज येते. त्यांचं आकलन वाढतं. ज्याचा उपयोग त्यांना पुढे जीवनातील अनेक समस्यांशी सामना करताना, त्या समजून घेताना होतो. पहिल्या प्रकारच्या बालनाटय़ांतून मुलांच्या कल्पकतेला प्रेरित करण्याची शक्ती अधिक असते. त्यांच्यातील सर्जनशीलतेचा विकास त्यातून होतो. ग्रिप्सच्या नाटकांमध्ये मुलांच्या कल्पनाशक्तीला फारसं स्थान नसतं, तर जीवन समजून देण्याघेण्याची प्रेरणा त्यात केंद्रस्थानी असते. या दोन्ही प्रकारच्या बालनाटय़ांतून मुलांची जडणघडण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तमरीत्या होतो. यास्तव मुलांच्या घडणीच्या काळात त्यांना आवर्जून बालनाटय़ं दाखवण्याची निकड असते. अर्थात काळानुरूप बालनाटय़ं बदलायला हवी, हेही खरंच. विशेषत: सध्याच्या माहिती विस्फोटाच्या युगात तर ती तांत्रिकदृष्टय़ाही प्रगत न होती तरच आश्चर्य. असं जरी असलं तरी आज बालरंगभूमीवरील परिस्थिती अशी आहे, की ती डोरेमॉन, पोकेमॉन, सुपरमॅन, सिन्चॅन या पात्रांमध्येच गुरफटली आहे. या बालनाटय़ांतून उथळ करमणुकीखेरीज मुलांना काहीच मिळत नाही. या बालनाटय़ांचा दर्जाही सुमारच असतो. आशयाचा तर पत्ताच नसतो त्यात. अशा थिल्लर बालनाटय़ांनी मुलांच्या कल्पकतेला ना उत्तेजना मिळत, ना इंटरनेट- मोबाइलसारख्या आभासी विश्वातून ती बाहेर येत. जगण्याबद्दलचं त्यांचं आकलन वाढण्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे अलीकडचे पालक अशी बालनाटय़ं मुलांना दाखवण्यापेक्षा ती न दाखवलेलीच बरी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु या सगळ्याचे गंभीर, दूरगामी परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतात, हे कुणाच्या लक्षात येत नाही. आजची पिढी स्मार्ट आहे यात शंका नाही. परंतु तिच्यातल्या सर्जनशीलतेला, प्रतिभेला योग्य वळण लावण्यासाठी त्यांच्या ठायी करुणा, सहिष्णुता आणि इतरांप्रती उदारता असावी लागते त्याची वानवा प्रकर्षांनं जाणवते. प्रज्ञेला करुणेची जोड नसेल तर ती हिटलरी प्रवृत्ती जन्माला घालते. आजच्या मुलांच्या बाबतीत ही आशंका पालकपिढीला सतत भेडसावताना दिसते. मुलांच्या सर्वागीण वाढीसाठी पालक त्यांना विविध कलांचं प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करतात खरे; परंतु आपलं मूल ‘माणूस’ म्हणून घडवण्याची प्रक्रिया मात्र त्यांच्याकडून दुर्लक्षिली जाते. याकामी बालरंगभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु उत्तम बालनाटय़ंच येत नसल्यानं पालकांचाही नाइलाज होतो. तथापि असं एखादं उत्तम बालनाटय़ आल्यास त्याचं भरभरून स्वागत करायला ते उत्सुक असतात. याचं प्रत्यंतर अद्वैत थिएटर निर्मित, झी प्रस्तुत ‘अलबत्या गलबत्या’ या रत्नाकर मतकरीलिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित नाटकाला होणाऱ्या आबालवृद्धांच्या गर्दीतून येतं. (योगायोगाची गोष्ट : नुकताच मतकरींना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.)
‘अलबत्या गलबत्या’ अद्भुतरम्य!
सनीभूषण मुणगेकरने आजच्या ‘स्मार्ट’ पिढीचं प्रतिनिधित्व करणारा अलबत्या तसाच स्मार्टपणे वठवला आहे.
Written by रवींद्र पाथरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-06-2018 at 01:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Albatya galbatya marathi natak review by ravindra pathare