मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या गंभीर दुखापतीस जबाबदार असल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खान रसायन तज्ज्ञाच्या साक्षीमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अपघातानंतर सलमानच्या घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यामध्ये ६२ मिलिग्रॅम मद्याचे प्रमाण आढळून आल्याची साक्ष या तज्ज्ञाने न्यायालयात दिली. मोटर वाहन कायद्यानुसार १०० मिलिलीटर रक्तामध्ये ३० मिलिगॅ्रम मद्याचे प्रमाण मान्य करण्यात आलेले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेत रसायन विश्लेषक म्हणून कार्यरत असलेले बी. के. बालशंकर यांची बुधवारी साक्ष नोंदविण्यात आली. अपघातानंतर वैद्यकीय चाचणी म्हणून सलमानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये ६२ मिलिग्रॅम मद्याचे प्रमाण आढळून आले. सर्वसाधारण १०० मिलिलीटर रक्तामध्ये हे प्रमाण ३० मिलिगॅ्रम असणे ग्राह्य मानण्यात आलेले आहे. तर एखाद्या व्यक्तीवर औषधोपचार सुरू असल्यास हे प्रमाण ४० ते ४५ पर्यंत आढळून येते, असे या तज्ज्ञाने न्यायालयाला सांगितले. सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी या तज्ज्ञाची उलटतपासणी घेण्यास नकार दिला.

रक्ताचे नमुने घेणारा डॉक्टर मात्र बेपत्ता
जे. जे. रुग्णालयातील ज्या डॉक्टरने सलमानच्या रक्ताचे नमुने घेऊन ते न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले होते. तो डॉक्टर मात्र सापडत नसल्याची बाब सलमानचे वकील शिवदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. केवळ तेच डॉक्टर सांगू शकतात की रक्ताच्या नमुन्याच्या नेमक्या किती बाटल्या पाठवल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol found in salman khans blood sample