कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर कपिल नव्या शोसह छोट्या पडद्यावर परतला. पण यावेळी त्याच्यासोबत सुनील नव्हता. कपिलला टक्कर देण्यासाठी सुनील एक वेगळाच शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यासाठी त्याला ‘भाभी जी घर पर है’ मालिका फेम शिल्पा शिंदेची त्याला साथ मिळाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यासोबतच आता अली असगर, सुयश राय आणि सुगंधा मिश्रा यांनीदेखील सुनीलशी हातमिळवणी केली आहे.

कॉमेडी आणि क्रिकेट या दोघांचं अनोखं समीकरण घेऊन सुनील एका वेब शो च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आगामी आयपीएलच्या निमित्ताने हा शो प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल असं म्हणायला हरकत नाही. ‘दे दना दन’ असं या वेब शोचं नाव असून जिओ टीव्ही अॅपवर दर शुक्रवार ते रविवार आयपीएल मॅचदरम्यान तो प्रसारित होईल.

वाचा : इरफानसाठी बॉलिवूडचे तिन्ही खान येणार एकत्र 

अली असगर, सुगंधा आणि सुयश यांच्यासोबतच परेश गणात्रा आणि सुरेश मेननसुद्धा शोमध्ये झळकणार आहेत. या वेब शोच्या एका विशेष भागाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून त्यामध्ये एम.एस.धोनी आणि हरभजन सिंग यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे आता क्रिकेट- कॉमेडीचा अनोखा तडका घेऊन सुनील ग्रोवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Story img Loader