बॉलीवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. अशातच अली चित्रपटांच्या शुटिंगमध्ये पुन्हा व्यग्र झालाय. त्याने ‘कंदाहार’ नंतर आणखी एक हॉलिवूड प्रोजेक्ट साइन केला आहे. त्याने अभिनेता बिल गुटेनटॅगचा ‘अफगाण ड्रीमर्स’ हा चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘अफगाण ड्रीमर्स’ चित्रपटाचं शुटिंग बुडापेस्ट आणि मोरोक्कोमध्ये केलं जाणार आहे. बिल गुटेनटॅग हे दोन वेळा ऑस्कर विजेते दिग्दर्शक आहेत. ‘यू डोन्ट हॅव टू डाय’ आणि ‘ट्विन टॉवर्स’ या दोन शॉर्ट फिल्म्ससाठी त्यांना ऑस्कर देण्यात आला होता.
क्रिती सेनॉन, करीना कपूर, तब्बू पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘या’ नव्या चित्रपटाची घोषणा
अलीने अफगाण ड्रीमर्स साइन केल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. “मी बिल गुटेनटॅग दिग्दर्शित चित्रपटात काम करण्यास खूप उत्साही आहे. ‘अफगाण ड्रीमर्स’ ही एक अतिशय महत्त्वाची कथा आहे आणि मला या सिनेमाच्या रीटेलिंगचा भाग बनून आनंद होत आहे,” असं अलीने म्हटलंय.
‘अफगाण ड्रीमर्स’ चित्रपट अफगाण मुलींच्या एका संघाच्या कथेवर प्रकाश टाकताना दिसेल. ही टीम जगभरात प्रवास करून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत, जागतिक मीडियाचे लक्ष वेधते. त्यानंतर ती जगभरातील आघाडीच्या राजकारण्यांना देखील भेटते. अफगाण तंत्रज्ञान उद्योजक रोया महबूब यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाची ही खरी कहाणी आहे. चित्रपटात रोया महबूबची भूमिका निकोहल बुशेरी साकारणार आहे.
याशिवाय अली गेरार्ड बटलरसोबत ‘कंदाहार’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. रिक रोमन वॉ दिग्दर्शित या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. या व्यतिरीक्त अली विशाल भारद्वाजच्या ‘खुफिया’ चित्रपटामध्ये तब्बूसोबत दिसणार आहे. हा चित्रपट अमर भूषण यांच्या ‘एस्केप टू नोव्हेअर’ या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट या वर्षाअखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.