भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना पुढे आणखी तिसऱ्या लाटेचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींनी या करोना व्हायरसचा धसका घेतलाय. प्रत्येकजण आपापल्यापरीनं या विषाणूबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न ‘RRR’ टीमने केलाय. ‘RRR’ फिल्मचे कलाकार आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या टीमने नुकताच कोरोनाबाबत जागरूक करणारा एक स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय.
ब्लॉकबस्टर फिल्म ‘बाहुबली 2’ चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी फिल्मचं नाव ‘RRR’ आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्याच्या ‘RRR’ टीमने एक स्पेशल व्हिडीओ तयार करून लोकांना करोना लसीकरणाचं महत्व पटवून दिलंय. या व्हिडीओमध्ये ‘साऊथचा सुपरस्टार’ जूनियर एनटीआर, बॉलिवूडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण, तेलगू फिल्मचा ‘रॉकींग स्टार’ राम चरण, बॉलिवूडची ‘क्यूट’ अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी लोकांना करोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी एकत्र येऊन करोना संसर्गाची साखळी तोडण्याचं आवाहन केलंय.
या स्पेशल व्हिडीओमधून ‘RRR’ टीमने तेलगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम आणि हिंदी भाषेतून लोकांना चेहऱ्यावर मास्क लावण्यासाठी आणि करोना लस घेण्यासाठी आश्वासन मागितलं आहे.
Wear a mask always
Get vaccinated when available ….Let’s #StandTogether to Stop The Spread of #COVID19 in India pic.twitter.com/yEWvniO6LH
— RRR Movie (@RRRMovie) May 6, 2021
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट तमिळ भाषेत तर अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआर हे तमिळ-कन्नड भाषेत बोलताना दिसून येत आहेत. तसंच अभिनेता अजय देवगण हिंदी भाषेत तर दिग्दर्शक एसएस राजामौली हे मल्ल्याळम भाषेत लोकांना घरातच बसून काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने घातलेले नियम पाळणं हाच पर्याय आहे, हे देखील ‘RRR’ टीमने या स्पेशल व्हिडीओच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. ‘RRR’ चित्रपटाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “मास्क लावा, आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा लस आवर्जुन घ्या…चला करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करोनाविरोधात एकजूट होऊया!”.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहता अनेक सेलिब्रीटी पुढाकार घेऊन लोकांना मदत करत आहेत. अनेक कलाकार तर त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना रूग्णांना योग्य ती मदत पुरवत आहेत. तसंच काही सेलिब्रिटी तर त्यांच्या सोशल अकाऊंटच्या स्टोरीजमधून ऑक्सिजन सिलेंडर्सच्या पुरवठ्याबाबत माहिती शेअर करताना दिसून येत आहेत.