आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच याविषयी नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. चित्रपटाचं advance booking जोरदार झालं असून नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बाहेर यायला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूड हंगमाच्या वृत्तानुसार ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी सुमारे ३८ कोटी कमावले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात हे सुरुवातीचे आकडे आहेत अजून याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ही कमाई पाचही भाषांमधल्या चित्रपटांची मिळून आहे. ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’, आणि ‘धूम ३’ या चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत ब्रह्मास्त्रने एवढी कमाई केली आहे.

हा रेकॉर्ड ‘नॉन हॉलिडे रेकॉर्ड’ असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हा एक सुखद धक्काच आहे. हा चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये चांगला चालला आहेच पण सिंगल स्क्रीनमध्येसुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं चित्र दिसत आहे. कोविड काळानंतर प्रदर्शित होणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा एकमेव बिग बजेट हिंदी चित्रपट आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’च्या आकड्यांनासुद्धा ब्रह्मास्त्रने मागे टाकलं आहे. ब्रह्मास्त्रने हिंदीमध्ये ३२ कोटी कमावले असून तर इतर भाषांमध्ये मिळून ५ कोटी कमावले आहेत.

आणखी वाचा : “मी गांधीवादी नाही, तर मी…” अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत

हा चित्रपट येत्या ३ दिवसात १०० कोटी हा आकडा पार करेल असं म्हंटलं जात आहे. येत्या सोमवारपर्यंत या आकड्यांमध्ये आणखीन वाढ होऊ शकेल. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’कडे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तसा बराच कालावधी आहे. सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागल्याने या कमाईच्या आकड्यावर परिणाम होऊ शकतो असंही म्हंटलं जात आहे.

Story img Loader