बॉलीवूडच्या सेलिब्रेटी कलाकारांनी मराठी चित्रपटात ‘पाहुणा कलाकार’ म्हणून का होईना काम करणे आता नवे राहिलेले नाही. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन, मास्टर भगवान दादा यांच्यावरील आगामी मराठी चित्रपटात काम करत आहे. हा कल आता दूरचित्रवाहिन्यांवरील दैनंदिन मराठी मालिकांमध्ये यायला सुरुवात झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रुंजी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्माते किंवा दिग्दर्शकांकडून बॉलीवूडच्या सेलिब्रेटी स्टारना मराठीत आणण्याचे काम केले जाते. हिंदीतील हे स्टारही छोटय़ाशा भूमिकेसाठी का होईना, पण मराठीत हजेरी लावतात. आलिया भट्ट हिच्या रूपाने आता बॉलीवूडची स्टार मराठीत छोटय़ा पडद्यावर दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रीती परी तुजवरी’ या मालिकेत ‘टाइमपास-२’चा ‘दगडू’अर्थात प्रियदर्शन जाधव नुकताच येऊन गेला होता. मालिकेच्या काही भागात त्याने काम केले होते. आलिया भट्ट हिचा ‘शानदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन आणि प्रसिद्धीचा भाग म्हणून आलियाने ‘रुंजी’मध्ये काम केले आहे.‘रुंजी’ मालिकेत रुंजीला आपल्या बहिणीचे लग्न करायचे आहे तर ‘शानदार’ चित्रपटात आलिया हीसुद्धा बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत आहे. तिला आपल्या बहिणीचे लग्न ‘शानदार’ करायचे आहे.
नवरात्रौत्सवानिमित्ताने सादर केलेल्या विशेष भागात आलिया भट्टचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. आलियाचे काम असलेल्या या भागाचे प्रसारण २१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर होणार आहे.

Story img Loader