सध्या सोशल मीडियावर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. मागच्या बऱ्याच काळापासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत तो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एकीकडे चित्रपटातील अभिनयासाठी आलियाचं जोरदार कौतुक होत असतानाच बॉयफ्रेंड रणबीर कपूर देखील तिला पाठिंबा देताना दिसत आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आलिया भट्टचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरनंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर त्यानं हटके अंदाजात चित्रपटाचं प्रमोशन करत आलियाला पाठिंबा दिला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर फोटोग्राफार्सनी रणबीरला, ‘आलियाच्या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?’ असा प्रश्न विचारला. फोटोग्राफर्सच्या या प्रश्नाला उत्तर देताना रणबीरनं हटके कृती केली ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
फोटोग्राफर्सना उत्तर देताना रणबीर कपूरनं या चित्रपटातील आलिया भट्टची नमस्कार करतानाची पोझ दिली. रणबीर कपूरचा हा हटके अंदाज सर्वांना आवडला असून त्याची ही कृती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एवढंच नाही तर स्वतः आलियानंही त्याच्या या कृतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिनं ‘बेस्ट बॉयफ्रेंड’ असं म्हटलं आहे. आलियाच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा हा फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचं प्रदर्शन करोनामुळे रखडलं होतं. पण आता हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२१ ला प्रदर्शित होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.