करोना विषाणूमुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. या काळात प्रत्येक जण घरात अडकला आहे. बऱ्याच काळापासून लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेकांना त्यांचे नियोजित कार्यक्रमही रद्द करावे लागले आहेत. मात्र याच काळातील कुटुंबातील सदस्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. अनेकांनी घरात राहून आपल्या कुटुंबाला वेळ दिला. घरातच सण, वाढदिवस साजरे केले. यात सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अलिकडेच अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या घरातील एका कर्मचाऱ्याला वाढदिवसानिमित्त गोड सरप्राइज दिलं. मात्र या कर्मचाऱ्याच्या हातून केक खाण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं.
लॉकडाउनच्या काळात अनेक जण घरात अडकले आहेत. तर अनेक जण घराबाहेर दुसऱ्या शहरामध्ये अडकले आहेत. यात आलियाच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही असंच काहीसं झालं आहे. त्यांच्याकडे काम करणारे अनेक कर्मचारी सध्या मुंबईतच असून काही जण अद्यापही आलियाच्या घरीच आहेत. यात त्यांच्यापैकी राशिदा या महिला कर्मचारीचा वाढदिवस होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे त्यांना तो सेलिब्रेट करता आला नाही. मात्र आलियाने त्यांचा वाढदिवस खास करण्यासाठी त्यांना सरप्राइज दिलं.
आलियाने आणि तिच्या बहिणीने शाहीनने मिळून राशिदा यांच्यासाठी खास केक आणला आणि मोठ्या जल्लोषात घरातल्या घरात हा वाढदिवस सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे राशिदा यांनी आलियाला केक भरवण्यासाठी हात पुढे केला, मात्र आलियाने हा केक खाण्यास नकार दिला.त्यामुळे सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, आलियाने डाएट सुरु केल्यामुळे तिने केक खाण्यास नकार दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, राशिदाने या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत माझा स्वप्नातील वाढदिवस असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.