बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक आणि बॉलिवूडमधील कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात चांगली कमाई केली आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जाणू काही जादूच केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १० कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी १३ कोटी ३२ लाख रुपायांचा गल्ला कमावला. त्यानंतर रविवारी चित्रपटाने १५ कोटी रुपये कमावले आहेत. प्रदर्शनाच्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने जवळपास ३८ कोटी ३२ लाख रुपये कमाई केली आहे. एकंदरीत चित्रपटाची कमाई पाहाता प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चं शाहरुख खान कनेक्शन! जयदीपची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान करोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. हे पाहता हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचे सगळे रेकॉर्ड तोडू शकतो. ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिक कमाई केली होती.
आणखी वाचा- “मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”; अदित्य ठाकरेंना टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या या संघर्षाची ही कथा आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, सीमा पाहवा, शांतनू माहेश्वरी आणि विजय राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.