२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी फार त्रासदायक ठरले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘भुलभलैय्या २’ अशा थोड्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ असे बरेचसे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना खूश करण्यात अपयशी ठरले. गेल्या काही दिवसांपासून देशात बॉलिवूड विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका हिंदी चित्रपटसृष्टीला बसत आहे. एकूण परिस्थिती पाहता अनेक निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉम्सवर प्रदर्शित करायचे किंवा प्रदर्शनाची तारीख पुढे नेण्याचे ठरवले आहे.
बॉलिवूडच्या कलाकारांसाठी हे वर्ष वाईट ठरत असले तरी, अभिनेत्री आलिया भट्टला २०२२ वर्ष लकी ठरले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली. गंगूबाई या भूमिकेसाठी आलियाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट २०२२ मधला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटानंतर लगेच मार्च महिन्यात बहुचर्चित ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एस. एस. राजामौलींच्या या सिनेमाच्या माध्यमातून आलियाने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपटदेखील तुफान चालला.
आणखी वाचा-शिल्पाने व्हिलचेअरवर असूनही पाळला दिलेला शब्द! व्हिडीओ होतोय व्हायरल
त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला आलियाच्या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्स’ नेटफ्लिक्सवर आला. यामध्ये आलियाने बद्रूचे मुख्य पात्र साकारले. आता सप्टेंबर महिन्यामध्ये आलियाची प्रमुख व्यक्तिरेखा असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आरआरआर’ नंतरचा आलियाचा हा दुसरा पॅन इंडिया सिनेमा आहे. सध्या ती याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे.
आणखी वाचा- ‘आता मी अभिमानाने सांगू शकते IIT मध्ये होते!’ आलिया भट्टची ‘ती’ पोस्ट चर्चेत
आता आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित हा चित्रपट १९६०-७० च्या काळात कामाठीपुरा येथे राहणाऱ्या गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारलेला आहे. करोना काळ असून सुद्धा हा चित्रपट हिट झाला. शिवाय बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये गंगुबाई काठियावाडी दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपटाला सलग आठ मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले होते. त्यामुळे ‘कश्मीर फाईल्स’, ‘आरआरआर’, ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ यांच्यासोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ देखील ऑस्करवारीच्या शर्यतीत असू शकतो असं म्हटलं जात आहे.