आलोकनाथचे आशीर्वाद आणि कन्यादान असोत किंवा ईशान शर्माची खराब बॉलिंग ‘सोशल मीडिया’च्या हल्ल्यापासून कोणाचीच सुटका नाही. त्यामुळे आता बॉलीवूडसकट सर्वानी या ‘सोशल मीडिया’ची धास्ती घेतली आहे. या सर्वाची खरी सुरुवात झाली होती ती रजनीकांतपासून. रजनीकांतच्या शक्तीचे आणि करामतीचे इतके किस्से फेसबुक, ‘ट्विटर’वर गाजले की शेवटी ‘आवरा यांना’ असे म्हणण्याची पाळी आली होती. नंतर आलोकनाथ, युवराज, सलमान खान, शाहरूख खान, ईशान शर्मा यांना लक्ष्य करण्यात आले. मध्यंतरी निवडणुकीच्या वातावरणात मोदी, राहुल गांधी, केजरीवाल हे सुद्धा या विनोदांचे धनी होते. आता नवखी आणि गोंडस आलिया भट्ट या सोशल मीडियाचे ‘गिऱ्हाईक’ झाली आहे. नेहमीप्रमाणेच निमित्त तिने स्वतहून दिले आहे.
मागे करण जोहरच्या ‘शो’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या ‘सामान्य ज्ञाना’ची छोटीशी झलक सर्वाना दाखवली होती. तशात गेल्या महिन्यात ती एका पुरस्कार समारंभाला आली असता पत्रकारांनी तिला काही ‘सोपे-सोपे’ सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारले. एकाचेही उत्तर ती देऊ शकली नाही. झाले..यानंतर नवीन ‘गिऱ्हाईका’च्या शोधात असणाऱ्या ‘नेटकरां’ना आयतीच संधी मिळाली. फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवìकग साईट्सवर आलियाच्या सामान्यज्ञानाची खिल्ली उडवणारे असंख्य विनोद पसरू लागले. त्यात ‘केबीसी’त पहिल्याच प्रश्नाला लाईफलाईन मागणाऱ्या आलियाकडे पाहून ती लाईफलाईन मागतेय की ५०-५० बिस्कीट हा प्रश्न पडलेला अमिताभ बच्चन, मोदींचे पाहिले नाव विचारताच..‘अब की बार’ असे उत्तर देणारी आलिया, असे धमाल विनोद आलियाच्या नाना विनोदी मुद्रांसह सोशल नेटवìकगवर तुफान गाजत आहेत. हे सारे इतके वाढले की, ‘मेरे बेटी पर जोक्स बनानेवालों. जनता माफ नहीं करेगी’ अशी तंबी देणारा महेश भट्ट यांचा विनोदही आता फिरू लागला आहे.
याआधी आलियाने तिच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातील ‘इश्कवाला लव्ह’ या गाण्याची खिल्ली उडवणाऱ्या चित्रफितीत सहभागी होऊन ‘मी माझ्यावर झालेली टीका खिलाडूवृत्तीने घेते’ हे दाखवून दिले होते. पण आता या विनोदअस्त्राच्या माऱ्यावर तिचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आणि जोपर्यंत सोशल नेटवर्किंगच्या  किडय़ांना नवीन गिऱ्हाईक मिळत नाही तोवर आलियाची सुटका आता कठीण दिसते.

Story img Loader