आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची प्रेक्षकांना मागच्या बऱ्याच काळापासून प्रतीक्षा आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आलिया भट्ट आणि चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आलियाचा एक किस्सा शेअर केला आहे. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर आलियाची प्रतिक्रिया काय होती हे त्यांनी यावेळी सांगितलं.
संजय लीला भन्साळी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातबाबत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘जेव्हा मी आलियाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. तेव्हा ती स्वतःची बॅग घेऊन माझ्या ऑफिसमधून पळून गेली होती. मी भन्साळी प्रोडक्शनच्या सीइओ प्रेरणा सिंहला सांगितलं होतं की आपल्याला नवी अभिनेत्री शोधावी लागेल. पण मला या भूमिकेसाठी मला आलिया परफेक्ट वाटत होती.’
भन्साळी पुढे म्हणाले, ‘दुसऱ्या दिवशी आलियानं मला कॉल केला आणि मला म्हणाली की मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर मी तिला, ‘नकार देण्यासाठी पर्सनली भेटण्याची गरज नाही’ असं सांगितलं होतं. पण त्यावर ती हसू लागली आणि मला म्हणाली, ‘तुम्ही माझ्याकडून जी भूमिका करून घेऊ इच्छिता ती भूमिका साकारण्यासाठी मी तयार आहे.’
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.