आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या सिनेमाचे तीन भाग असणार आहेत. जबरदस्त स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच मोठी मेहनत या सिनेमासाठी संपूर्ण टीमने घेतली आहे. असं असलं तरी सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने सिनेमाची कथा काय असणार आहे हे सांगितलंय.
गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय.या व्हिडीओत त्याने सिनेमाची संपूर्ण कथा सांगितली नसली तरी कथेचा सार मात्र सांगितला आहे.
काय आहे अस्त्रावर्स ?
अयानने व्हिडीओत त्याच्या सिनेमातील अस्त्रावर्सबद्दल खुलासा केलाय. “गेल्या काही दशकांमध्ये आपण अस्त्रांच एक अनोख विश्व निर्माण केलंय. या विश्वाचं नाव ‘अस्त्रावर्स’ (Astraverse) असं आहे. ब्रह्मास्त्र हा या चित्रपटाचा पहिला भाग असून तो प्राचीन भारतातील एका दृश्याने सुरू होतो. “
हे देखील वाचा: लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांना कंटाळून अथियाने शेअर केली पोस्ट, सुनील शेट्टीनेही दिलं स्पष्टीकरण
पुढे सिनेमाच्या कथेविषयी सांगताना अयान म्हणाला, “हिमालय पर्वतात घोर तपश्चर्या करणाऱ्या काही ऋषिमुनींना स्वर्गातून एक वरदान मिळतं. या वरदानातून त्यांना एक ब्रह्मशक्ती प्राप्त होते. याच शक्तीतून अस्त्रांचा उगम होतो. ही अस्त्र निसर्गाच्या दैवी शक्तीने परिपूर्ण आहेत. जसं की जलास्त्र, पवनास्त्र आणि अग्नीअस्त्र. तसंच काही अस्त्र अशी आहेत ज्यात जनावरांची शक्ती पाहायला मिळते. मात्र सर्वात शेवटी या मुनींना शक्तीशाली आणि सर्व अस्त्रांची शक्ती असलेलं ब्रह्मास्त्र प्राप्त होतं. तर या सर्व अस्त्रांच्या संरक्षणाची जबाबदारी ऋषिमुनी घेतात. या ऋषिमुनींना ब्रह्मांश म्हणतात. “
पुढे अयान सांगतो, “हे ऋषीमुनी समाजाचा एक घटक बनून या अस्त्रांचं रक्षण करत असतात. पिढ्यानपिढ्या ते ही जबाबदारी सांभळत असतात. सिनेमामध्ये सध्याच्या युगात अस्त्राचं संरक्षण करणाऱ्या ऋषीमुनीची म्हणजेच ब्रह्मांशांची कथा पाहायला मिळणार आहे.” या सिनेमामध्ये रणबीर कपूर अग्नी शक्ती असलेला अस्त्र आहे. तर नागार्जुन आणि अमिताभ बच्चन हे ब्रह्मांशांच्या भूमिकेत झळकणार आहेत.
हे देखील वाचा: अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरला करतेय डेट?, चर्चांना उधाण
बहुतेक दिग्दर्शक सिनेमाची कथा लपविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सिनेमाचा टीझर असो किंवा ट्रेलर सिनेमाची मूळ कथा न सांगता केवळ प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल उत्कंठा निर्माण करण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न असतो. अशात अयानने मात्र रिलीज पूर्वीच सिनेमाची कथा काय असले हे उघड केलंय. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.