बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचा सोशल मीडियावर बरंच कौतुक झालं होतं. त्यानंतर अलिकडेच या चित्रपटातील ‘ढोलिडा’ हे गाणं प्रदर्शित झालं. ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. काहींनी या गाण्यावर आलियानं केलेल्या डान्सचं कौतुक केलं तर काहींनी मात्र तिनं दीपिकाची कॉपी केल्याचं म्हणत किंवा तिला डान्स जमलेलाच नाही असं म्हणत तिच्यावर टीका केली होती. एकंदर या गाण्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता आलिया भट्टनं यावर भाष्य करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया म्हणाली, ‘या चित्रपटात दोन गरबा गाणी आहेत. दोन्ही गाणी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. यातलं एक गाणं हे गंगावर चित्रित करण्यात आलंय तर दुसरं गाणं हे गंगूबाईवर चित्रित केलं गेलंय. गाण्याची कोरिओग्राफी कृती महेशनं केली आहे. दोन्ही गाणी शूट करताना गंगासाठी एक वेगळी एनर्जी हवी होती तर गंगूबाईसाठी त्याहून वेगळी एनर्जी माझ्याकडून अपेक्षित होती. मी ढोलिडा गाण्याचा पहिला पार्ट एकाच शॉटमध्ये संपवला आणि याची प्रॅक्टिसदेखील मी त्याआधी केली नव्हती.’
आलिया पुढे म्हणाली, ‘जेव्हा लोकांनी हे गाणं पाहिलं तेव्हा त्यांना गाण्याचा शेवटचा भाग सर्वांना आवडला आहे. गाणं खूप चांगलं आहे असं अनेकजण म्हणताना दिसत आहेत. ज्या लोकांना मी आवडत नाही ते लोक पण म्हणत आहेत की, आलियानं मेहनत केली आहे. हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण लोक माझ्याबद्दल घराणेशाही आणि इतर अशा अनेक गोष्टी बोलत असतील. पण अखेर मला स्वतःला या ठिकाणी सिद्ध करायचं असेल तर मेहनत करावी लागणारच आहे. कारण मला कॅमेराला सामोरं जायचं आहे. तुम्ही मला वाईट डान्सर किंवा अभिनेत्री म्हणू शकता. मी प्रत्येक गोष्टीत वाईट आहे असं म्हणू शकता. पण आलिया मेहनती नाही असं कोणी म्हणू शकत नाही. कारण जर आज या चित्रपटाच्या सेटवर तुम्ही मेहनत करत नसाल तर तुम्ही पुढच्या चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाही.’