बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा चित्रपट ‘डार्लिंग’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. आलियानं या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणूनही पदार्पण केलंय. याशिवाय ती या चित्रपटात मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. नुकतीच आलियानं ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी चित्रपटासंबंधी तिने इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका आणि चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांच्याशी संवाद साधला. तसेच बॉलिवूडच्या सद्यस्थितीवरही तिने भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलाखतीत आलियाला, ‘सध्या बॉलिवूड चित्रपटांसाठी कठीण काळ आहे अशा निर्माती होण्याचा निर्णय घेणं आव्हानात्मक वाटलं नाही का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आलिया म्हणाली, “नाही, कारण मला वाटतं हे संपूर्ण वर्ष भारतीय चित्रपटांसाठी कठीण काळ आहे. आपण फक्त सातत्यानं हिंदी चित्रपटांबद्दल बोलतोय. पण आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आकडा पाहता आपल्या हे लक्षात येईल की संपूर्ण देशभरात फार कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. अगदी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलायचं तर त्यातले सर्वच चित्रपट हिट झालेले नाहीत. काही निवडक चित्रपट खूपच हिट ठरले. हिंदी चित्रपटांचंही तसंच आहे. हिंदीतील काही चित्रपटांनीही चांगला गल्ला जमवला आहे. ज्या चित्रपटाचा कंटेन्ट चांगला आहे. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि हे नेहमीच होतं.”

आणखी वाचा- Video : “हेच भारतीय संस्कार…” आलियाच्या ‘त्या’ कृतीचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

आलिया पुढे म्हणाली, “आजकाल चित्रपटांची फार बारकाईने समीक्षा होते. कारण करोनाच्या काळात बराच काळ चित्रपटगृह बंद होती आणि चित्रपटसृष्टी काही काळासाठी पूर्णपणे बंद पडली होती. त्यानंतर आता कोणते चित्रपट प्रेक्षकांना आवडतील, कोणते चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करायचे आणि कोणते ओटीटीवर हे ठरवलं जातं. ज्या चित्रपटांचे विषय चांगले आहेत ते अर्थातच चांगले चालतात. इतर अपयशी ठरत आहेत पण याचा अर्थ हिंदी चित्रपटसृष्टी संपुष्टात आली असा होत नाही.”

दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर ती तिचा ‘डार्लिंग’ चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt reacts on current bollywood industry situation know more mrj