अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटावर कंगना रणौतने अनेकदा टीका केली आहे. बॉलीवूडमधल्या घराणेशाहीवर कंगना रणौत वारंवार निशाणा साधत असते. मात्र आलिया भट्टच्या चित्रपटाबद्दल तिने तर हा चित्रपट चालणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आलिया भट्ट कोलकाता येथे या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना कंगना रणौतने केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले आहे.
कंगनाने आलिया भट्टवर कमेंट करत निशाना साधला होता. कंगनाने आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर कमेंट करत, हा चित्रपट फ्लॉप होणार कारण यात मुख्य भूमिका साकरण्यासाठी चुकिच्या अभिनेत्रीला निवडले आहे, असे म्हटले होते.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली होती. आलियाचे नाव न घेता कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला ‘पापा की परी’ म्हणत, “या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा चुराडा होईल. पापा की परी (चित्रपट माफिया डॅडी) आणि (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे) कारण पापाला सिद्ध करायचे आहे की रोमकॉम बिम्बो अभिनय देखील करू शकते. या चित्रपटाचा सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे कास्टिंग आहे. हे सुधारणार नाहीत. यामुळे चित्रपटगृह आता फक्त दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांकडे वळत आहेत. जोपर्यंत चित्रपट माफिया सत्तेत आहेत तोपर्यंत बॉलीवूडच्या नशिबात हेच लिहिले आहे”, असे म्हटले होते.
“बॉलिवूड ‘माफिया डॅडी पापा जो’ एकट्याने चित्रपटसृष्टीची संस्कृती बदलली आहे. अनेक मोठ्या दिग्दर्शकांचे मानसिक खच्चीकरण केले आणि त्यांना पाहिजे त्या कलाकारांना काम दिलं. या चित्रपटानंतर आणखी एक उदाहरण समोर येईल. लोकांनी ते पाहणं बंद करायला हवे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता देखील याच्या खच्चीकरणाचा बळी गेले आहेत,” असे कंगनाने पुढे म्हटले होते.
कंगना राणौतला आलिया भट्टचं उत्तर
आलिया भट्ट तिच्या चित्रपटातील ‘मेरी जान’ गाणे लाँच करण्यासाठी कोलकात्यात होती. यातच कंगना रणौतच्या टीकेला आलिया भट्टने उत्तर दिले. पीटीआयच्या वृत्तानुसार, “भगवान कृष्णाने गीतेत म्हटले होते की निष्क्रियता ही एक क्रिया आहे. मला एवढेच सांगायचे आहे,” असे आलियाने म्हटले. त्यामुळे आता आलिया भट्टने तिच्या कामातून कंगना रणौतला उत्तर देण्याचे ठरवले आहे का हे फक्त काळच सांगेल.
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट एस हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात आलिया भट्टशिवाय अजय देवगण, विजय राज, सीमा पाहवा आणि शंतनू माहेश्वरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.